Food Startup Business:- एखादी कल्पना किंवा गरज व्यवसायामध्ये रूपांतरित करणे आणि तो व्यवसाय भरभराटीला आणणे हे पाहिजे तेवढे सोपी गोष्ट नाही. कारण अशा प्रकारच्या कल्पना सत्यात उतरवून त्यांना व्यावसायिक रूप देऊन तो व्यवसाय वाढीस लावण्याकरिता तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागते.
तसेच तुमच्यामध्ये असलेले व्यावसायिक गुण पणाला लावून तो व्यवसाय वाढीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे देखील गरजेचे असते. तेव्हा कुठे एखादा व्यवसाय भरभराटीला येतो व ती कल्पना देखील सत्यात उतरते.

अगदी याच पद्धतीने जर आपण उदाहरण घेतले तर गुडगाव मध्ये राहणाऱ्या वंदना मेहता यांचे घेता येईल. आपल्या मुलीला आरोग्यदायी खायला मिळावे याकरिता त्यांनी घरातच फूड स्टार्टअप सुरू केला व आज हा स्टार्टअप जवळपास 25 लाख रुपये वार्षिक टर्नओव्हर पर्यंत पोहोचला आहे.
अशाप्रकारे घरातून सुरू केला व्यवसाय
वंदना मेहता या 2013 मध्ये कम्युनिकेशन, रिटेल आणि रिअल इस्टेट सारख्या उद्योगांमध्ये काम करत होत्या.परंतु नंतर त्यांच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर मात्र त्यांना नोकरी सोडावी लागली. नोकरी सोडल्यानंतर ते पूर्ण वेळ त्यांच्या मुलीची देखभाल आणि काळजी घेत होत्या.
कालांतराने जेव्हा त्यांची मुलगी मोठी झाली तेव्हा ती मुलगी खाण्यासाठी केक आणि कुकीजची मागणी करू लागली.यावरून मुलीला निरोगी खायला मिळावे असे वंदना मेहता यांना वाटायचे. परंतु बाजारामध्ये जे काही ब्रँड होते ते खऱ्या अर्थाने निरोगी उत्पादने देत आहेत असे त्यांना दिसून आले नाही.
त्यामुळे मुली करिता घरीच त्यांनी हेल्दी केक बनवायला सुरुवात केली.हा केक बनवण्यासाठी त्यांनी बाजरी आणि बदामाचे पीठ वापरले व हळूहळू यापासून अनेक पर्याय तयार केले.
त्यांनी जो काही केक बनवायला सुरुवात केली तो केक त्यांच्या मित्रांना तसेच नातेवाईकांना आणि काही ओळखीच्या लोकांना खायला दिला व त्या लोकांना खूप आवडला. लोकांचे हे कौतुक ऐकून त्यांनी स्वतःचा व्यवसाय या क्षेत्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला.
वीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू केला व्यवसाय
घरातील स्वयंपाक घरातून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि त्यासाठी व्यावसायिक ओव्हन आणि इतर बेकिंग उपकरणांकरिता वीस हजार रुपयांची गुंतवणूक केली व स्वतःचा ब्रँड चॉकलेट कॉर्नर सुरू केला.
त्या एकट्या घरी विविध प्रकारचे केक आणि चॉकलेट बनवायचे आणि नंतर सोसायटी तसेच शाळा, कम्युनिटी हॉल इत्यादी ठिकाणी प्रदर्शन किंवा उत्सवांमध्ये स्टॉल लावून त्याची विक्री करायच्या.
तीन ते चार मिठाई आणि केक डिश पासून सुरू झालेल्या त्यांचा व्यवसाय आज ग्राहकांना मिठाई आणि कुकीजाची जवळपास 70 उत्पादने पुरवत आहे. यामध्ये ब्राऊनीज, वेगवेगळ्या फ्लेवरचे केक आणि चहाचे केक इत्यादींचा यामध्ये समावेश आहे.
वंदना या त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये मुख्यतः ओट्स, बदामाचे पीठ तसेच गूळ, कव्हर्चर चॉकलेट आणि नट्स इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात.
त्यांनी अगोदर सुरू केलेल्या चॉकलेट कॉर्नर या ब्रँड व्यतिरिक्त त्यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये निरोगी कुकीज बनवण्यासाठी ब्लीसफुली युवर्स हा स्पेशल ब्रँड लाँच केला. त्या सध्या रागी कुकीज, ज्वारी कुकीज तसेच ओट्स कुकीज, क्रेनबेरी कुकीज यासारख्या 12 प्रकारच्या कुकीज बनवत आहेत.
2023 या आर्थिक वर्षात केली होती 25 लाखांची उलाढाल
वंदना मेहता त्यांच्या उत्पादनांमध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रक्रिया केलेली साखर किंवा रंगांचा वापर करत नाहीत. त्यांच्या सुरुवातीच्या चॉकलेट कॉर्नर या ब्रॅंडने लॉन्च झाल्यानंतर सहा महिन्यात एक लाख रुपये कमावले होते आणि वर्षभरात पाच लाख रुपयांची उलाढाल झाली होती.
विशेष म्हणजे कोरोना कालावधीमध्ये देखील त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू राहिला. 2023 मध्ये त्यांनी या व्यवसायातून 25 लाख रुपयांची उलाढाल केली. वीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू केलेल्या व्यवसायातून 25 लाख रुपयांची उलाढालीपर्यंत वंदना मेहता पोचल्या असून यामागे नक्कीच त्यांचे प्रचंड प्रमाणात असलेले कष्ट कारणीभूत आहेत.
त्यांच्याकडे क्लाऊड किचन असून त्यांच्या सगळ्या उत्पादनांची निर्मिती या क्लाऊड किचन मध्ये केली जाते व नंतर पॅकिंग आणि इतर काम स्टुडिओमध्ये केले जाते. पाचजण सोबतीला घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला आहे व यामुळे पाच जणांना रोजगार देखील मिळाला आहे.