स्वयंघोषित मुख्यमंत्री राज्यात वाढले – राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagarlive24
Published:
vikhe

आम्ही काम करणारे माणसं आहोत, केवळ हसून वेळ मारून नेणारे नाही. एकीकडे महायुतीच्या योजनांना विरोध करण्यासाठी न्यायालयात जायचे आणि दुसरीकडे योजनांचे फॉर्म भरून घेण्यासाठी धावपळ करायची, हा महाविकास आघाडीच्या नेत्याचा दुटप्पीपणा लोकांनी ओळखला असल्याने राज्यातील सामान्य माणूस महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

महसूल पंधरवडा निमित्ताने तालुक्यातील १ हजार ८०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे प्रमाणपत्र मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले. प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसिलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, मुख्याधिकारी राहूल वाघ, भाजपाचे शहराचे अध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष शरद गोर्डे, प्रवरा बँकेचे व्हा.चेअरमन मच्छींद्र थेटे, भाजपाच्या महीला जिल्हाध्यक्षा सौ.कांचन मांढरे, भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जावेद जहागिरदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यातील सरकार जनतेच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे लोकांच्या हिताचे निर्णय होत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील ६ लाख महीलांनी अर्ज दाखल केले केले असून, एकट्या संगमनेर तालुक्यात ८० हजार ४१४ भगीनीनी दाखल केलेले अर्ज मंजूर झाले असून, येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे विखे पाटील यांनी सांगितले.

महायुतीच्या योजनेच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते न्यायालयात गेले. पण न्यायालयाने सुध्दा त्यांना चपराक देवून सरकारच्या योजनेला आणि राज्यातील भगीनीना न्याय दिला असल्याचा टोला लगावून मंत्री विखे म्हणाले की, महायुतीच्या योजनामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोटशूळ उठला आहे.

पण सरकार मागील अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून दिल्याने एकट्या संगमनेर तालुक्यात ४७३ कोटी रुपयांचा निधी योजना आणि विकास प्रक्रीयेसाठी उपलब्ध करून दिला असल्याचे स्पष्ट करून तालुक्याच्या विकास कामांना निधी कमी पडणार नाही. हा तालुका विकासासाठी आता आपण दत्‍तक घेणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये कोणताही समन्वय नाही. प्रत्येकाला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडू लागले आहेत, स्वयंघोषित मुख्यमंत्री राज्यात वाढले आहेत. उध्दव ठाकरे राज्यातील कॉग्रेस नेत्यांना बाजूला ठेवून थेट दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्‍यांना भेटतात हे आश्चर्यकारक असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी केले. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास तालुक्यातील लाभार्थी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe