सालीमठ तुम्ही विखेंचे नव्हे जनतेचे नोकर ! सोमवारी शासकीय कार्यालये बंद करणार,आंदोलनस्थळी जिल्हाभरातील नेत्यांची हजेरी 

रॅलीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. खा. नीलेश लंके हे स्वतः ट्रॅक्टर चालवत या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. दरम्यान, विशेषतः रविवारी सकाळी ट्रॅक्टर नगरकडे निघाल्याने नगर - पुणे व नगर - कल्याण महामार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली होती.

Published on -

खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या रविवारी, तिसऱ्या दिवशी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी नगर शहरातून काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमुळे चक्का जाम होऊन  वाहतूकीची कोंडी झाली.  दरम्यान, सोमवारी आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी शासकीय कार्यालये बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. रविवारी मेहबूब शेख, प्रभावती घोगरे, मा. आ. राहुल जगताप, मा. आ. भानुदास मुरकुटे, घनश्याम शेलार, अरूण कडू, मा. आ. साहेबराव दरेकर, गोविंद मोकाते यांच्यासह जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील नेतेमंडळींनी आंदोलस्थळी हजेरी लावत पाठींबा दर्शविला.

दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर रॅलीस सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, सुरभी हॉस्टिपल, डीएसपी चौक, स्टेट बँक चौक, चांदणी चौक, बसस्थानक, हॉटेल राज पॅलेस पासून टिळक रोड, नेप्ती नाका, दिल्ली गेट, अप्पू हत्ती चौक मार्गे ही रॅली पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचली. रॅलीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. खा. नीलेश लंके हे स्वतः ट्रॅक्टर चालवत या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. दरम्यान, विशेषतः रविवारी सकाळी ट्रॅक्टर नगरकडे निघाल्याने नगर – पुणे व नगर – कल्याण महामार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली होती.

यावेळी बोलताना अरूण कडू यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत राधाकृष्ण विखे व दुग्ध खात्याचे विचित्र नाते असल्याचे सांगितले. ज्या ज्या वेळी विखे यांच्याकडे दुग्ध खाते आले त्यावेळी दुध धंंद्याचे, दुग्ध उत्पादकांचे वाटोळे झाल्याचा आरोप कडू यांनी केला. दुग्ध व्यवसायाचे वाटोळे करण्यास विखे यांनी श्रीरामपुर व प्रवरा दुध संघापासून सुरूवात केली. विखे यांच्या ताब्यातून प्रवरा दुध संघ काढून घेतत्यानंतर १८ वर्षे या संघाचा कारभार उत्कृष्ट चालला. तरीही विखे यांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याची दोनदा नोटीस बजावली.

सत्तेचा वापर करून टँकर नाकारण्याचे कारस्थान करण्यात आले. प्रवरा दुध संघ त्यांनी मोडकळीस आणला महानंदा डेअरी मातीत घातली असल्याचे सांगत दुध धंद्याची विखे यांना कदर नसल्याचा आरोप कडू यांनी केला.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले, पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्विकारले असते तर आम्ही आंदोलन मागे घेतले असते. आज जिल्हाधिकारी आमच्याकडे आले तरी आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडले पाहिजे ही आमची भूमिका आहे.

मा. आ. राहुल जगताप म्हणाले, या प्रश्‍नासाठी खा. लंके यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबू नये. झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी गाजावाजा करावा लागेल गोंधळ घालावा लागेल. कांदा, साखर निर्यातबंदी करून केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांची आडवणूक करीत असल्याचे जगताप यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले, मा. खा. सुजय विखे यांनी कोरोना संकटात विमानातून रेमडीसिवर इंजेक्शन दाखविले, मात्र त्याचे पुढे काय झाले हे माहीती नाही. दुसरीकडे नीलेश लंके यांनी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू करून हजारो रूग्णांची सेवा केली. विखे कुटूंबाला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचे देणे घेणे नाही तर खोटे गुन्हे दाखल करणे, चौकशा लावून विनाकारण त्रास देणे यात त्यांना रस आहे.

सालीमठ तुम्ही विखेंचे नव्हे जनतेचे नोकर !

जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ हे दबावातून या आंदोलनाकडे दूर्लक्ष करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की हे सरकार फक्त तीन महिने आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना जनतेच्या करातून पगार दिला जातो विखे यांच्याकडून नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. मेहबूब शेख प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक काँग्रेस

पंजाबच्या रॅलीची आठवण

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमुळे पंजाबमध्येही वाहतूकीची कोंडी झाली होती. त्याच धर्तीवर नगर शहरात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. दरम्यान, सकाळपासून नगर शहरात आंदोलस्थळी विविध रस्त्यांवरून येणारे ट्रॅक्टर पोलीसांना आडविले होते. मात्र आंदोलनस्थळावरून इशारा देण्यात आल्यानंतर हे ट्रॅक्टर आंदोलस्थळाकडे सोडण्यात आले. ही ट्रॅक्टर रॅली ट्रेलर आहे. या प्रश्‍नी यापेक्षाही तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लंके समर्थकांनी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!