विखेंना बाराही विधानसभा जडच ! नगरी राजकारणाचा नवा आध्याय थोरात – लंके – गडाख

नगर जिल्ह्यात सहकाराचं जाळं आहे. येथील साखर सम्राटांनी आपापले कार्यक्षेत्र जपलं आहे. सहकाराच्या जिवावरचं येथे राजकारण चालतं. साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, पतसंस्था यावर राजकारणाचं गणित सोडवलं जातं. प्रत्येक निवडणूक ही 'डंके की चोट' पर होते. नगर जिल्ह्याचं राजकारण समजून घ्यायचं असेल, तर पहिल्यांदा येथील नातं-गोतं समजून घ्यावं लागतं.

Ahmednagarlive24
Published:
vikhe

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादा महायुतीत असतील का, हे ठरलेलं नसलं तरी महाविकास आघाडी मात्र एकत्रित लढणार आहे. नगर जिल्ह्याचा विचार करता, येथील सगळं राजकारण हे सोयऱ्या- धायऱ्याच्या जोरावर चालतं, असं म्हणतात. नगरी सोयरे-धायरे वेगवेगळ्या पक्षात असले तरी, आपापले तालुके आणि कार्यकर्ते जपून आहेत. नगर जिल्ह्यात सोयऱ्या-धायऱ्यांचे प्रामुख्याने दोन गटांत राजकारण चालते. पहिला गट आहे तो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा, तर दुसरा गट आहे भाजपच्या शिवाजीराव कर्डिलेंचा… सहकारातील साखर सम्राटांच्या या जिल्ह्यात संगमनेरच्या थोरातांचा गोतावळा मोठा आहे.

तरीही लोणीच्या विखे कुटुंबाने या गटाला खिंडीत गाठण्याचा, यशस्वी प्रयोग अनेकदा केलाय. मात्र गेल्या लोकसभेपासून जिल्ह्याचं वारं फिरल्याची चर्चा आहे. विखेंना दक्षिणेत पराभूत करुन जायंट किलर ठरलेल्या निलेश लंकेंची यावेळी थोरात गटाला साथ मिळणार आहे. त्यामुळे सहाजिकच आगामी विधानसभा निवडणूक ही महायुतीला अवघड जाण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात नेमकं काय होऊ शकतं, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

नगर जिल्ह्यात सहकाराचं जाळं आहे. येथील साखर सम्राटांनी आपापले कार्यक्षेत्र जपलं आहे. सहकाराच्या जिवावरचं येथे राजकारण चालतं. साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, पतसंस्था यावर राजकारणाचं गणित सोडवलं जातं. प्रत्येक निवडणूक ही ‘डंके की चोट’ पर होते. नगर जिल्ह्याचं राजकारण समजून घ्यायचं असेल, तर पहिल्यांदा येथील नातं-गोतं समजून घ्यावं लागतं.

संगमनेरचे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे नेते आहेत. पार्थर्डीचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे यांना त्यांची बहिण दिली आहे. म्हणजेच भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे या त्यांच्या भाचेसून आहेत. याच आप्पासाहेब राजळेंची मुलगी नेवाशाचे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार शंकराराव गडाख यांना दिली आहे. दुसरीकडे अजित पवार गटात असलेल्या शेवगाव-पाथर्डीच्या माजी आमदार चंद्रशेखर घुले एक कन्या नेवाशातील गडाखांची सून आहे. तर घुलेंची दुसरी मुलगी कोपरगावचे अजितदादा गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळेंना दिली आहे.

तसेच माजी आमदार नरेंद्र घुले व राहुरीचे शरद पवार गटाचे माजी आमदार प्रसाद तनपुरे हे सख्खे साडू आहेत. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या भगिणी या दोन्ही कुटुंबाच्या सूनबाई आहेत. या सगळ्या नातेसंबंधांचा विचार केला, तर जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे, आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरे, शंकरराव गडाख, मोनिका राजळे हे विद्यमान सहा आमदार एकमेकांचे जवळचे नातलग आहेत. याच नातेसंबंधातील मुख्य दुवा असलेल्या घुले कुटुंबातही दोन माजी आमदार आहेत. विशेष म्हणजे हा गोतावळा काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप या सगळ्याच पक्षात विखुरलेला आहे. पक्ष वेगवेगळे असले तरी, त्यांच्यात मतभेद नाहीत. वेळेप्रसंगी ते आतून एकमेकांना मदत करु शकतात. राज्यात कुणीही सत्तेत असले तरी, या गोतावळ्यात मनभेद कधीच होत नाही. हाच इतिहास आहे.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा हा गोतावळा आजही आदर करतो. याच थोरातांना विखेंविरोधात लढण्यासाठी यापुढे विद्यमान खा. निलेश लंकेंची मदत होणार आहे. साखर सम्राटाचा समजल्या जाणाऱ्या नगर उत्तरेत थोरातांचे नातेसंबंध तर दक्षिणेत खा. निलेश लंके अशी एकत्रित ताकद आगामी विधानसभेत दिसणार आहे. हिच ताकद विखेंना जड जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सगळ्या दृष्य- अदृष्य विरोधकांचा बदला विखेंना येत्या विधानसभा निवडणुकीत घ्यायचाय. मात्र थोरात-लंके या जोडगोळीमुळे हा बदला सहज शक्य होणार नाही. प्रत्येक तालुक्यात असलेली विखे गटाची ताकदच हार-जीत ठरवते, असा अनुभव आहे. मात्र यावेळी हिच विखे यंत्रणा प्रभावी ठरेल का, हा प्रश्न आहे. काँग्रेस, शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटाने नगरमधील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. जिल्ह्यातील बारा विधानसभेतही थोरात विखेंची कोंडी करण्याची शक्यता आता वाढली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe