Panjabrao Dakh:- यावर्षी महाराष्ट्रामध्ये पावसाने खूप मोठ्या प्रमाणावर निराशा केल्याचे चित्र असून मुळात यावर्षी पावसाची सुरुवातच निराशाजनक झालेली होती. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. परंतु त्यानंतर जुलैमध्ये पावसाने महाराष्ट्रामध्ये सर्व दूर हजेरी लावली व खरिपाच्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला व पेरण्या पूर्ण देखील झाल्या. परंतु त्यानंतर मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने खूप मोठा खंड दिला व खरिपाची पिके वाया जाण्याची भीती निर्माण झालेली होती.
परंतु सप्टेंबर महिन्यात पावसाने परत राज्यातील बऱ्याच भागात चांगल्यापैकी हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले. तसे पाहायला गेले तर यावर्षी राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी देखील गाठलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असताना मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्राला थोडा बहुत दिलासा मिळाला.

विशेष म्हणजे राज्यातील बऱ्याच धरणांमधील पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे तूर्तास बऱ्याच जिल्ह्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली असे सध्या चित्र आहे. आज सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस असताना उद्यापासून म्हणजेच एक आक्टोबर नंतर महाराष्ट्र मध्ये पाऊस कसा राहील हा देखील एक मोठा प्रश्न आहे.
त्यातच मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत असल्यामुळे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मनामध्ये परतीचा पाऊस कसा पडेल हा एक मोठा प्रश्न आहे. या अनुषंगाने जर आपण शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाव असलेले व प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी ऑक्टोबर महिन्यातील हवामान अंदाज वर्तवलेला आहे व त्याबाबतचीच महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
पंजाबरावांचा ऑक्टोबर महिन्यातील हवामान अंदाज
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी ऑक्टोबर महिन्यातील हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे की राज्यामध्ये दोन ऑक्टोबर नंतर मोकळे वातावरण राहणार असून पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. परंतु काही भागांमध्ये पाच,सहा आणि 7 ऑक्टोबरला पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
या कालावधी दरम्यान पूर्व विदर्भातील अमरावती, वाशिम, वर्धा तसेच नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, उदगीर, लातूर तसेच अकोला या भागामध्ये थोडा बहुत पाऊस पडणार असे त्यांनी म्हटले आहे. परंतु या कालावधीत राज्याच्या उर्वरित भागामध्ये पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे.
परंतु दिलासादायक म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या काळात पुन्हा एकदा पाऊस येण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. जर पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरला तर नक्कीच तो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल हे मात्र निश्चित.