पोस्ट खात्यात ५ हजार जागांची भरती सुरू

Ahmednagarlive24
Published:

देशात आर्थिक मंदीचं सावट असताना तसंच ऑटो सेक्टरसह वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांना नोकऱ्या गमाविण्याची वेळ आलेली असताना देशातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील पोस्ट खात्यात (डाक सेवा) ५ हजार जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांना ही नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. 

आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यात ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विविध खात्यांत ही भरती केली जाणार आहे. आंध्र प्रदेशात २ हजार ७०७, छत्तीसगडमध्ये १ हजार ७९९ तर तेलंगणात ९७० जागांची भरती केली जाणार आहे. 

यासंबंधीची अधिकची माहिती indiapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून या भरतीप्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. सर्व पात्र उमेदवार १४ नोव्हेंबर २०१९ पयंर्त या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्जासंबंधी तसंच पदासंबंधी सविस्तर माहिती पोस्ट खात्याच्या अधिकृत appost.in/gdsonline या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

पात्र ठरल्यानंतर उमेदवाराला कमीत कमी १० हजार रुपये तर जास्तीत जास्त १४ हजार ५०० रुपये पगार मिळणार आहे. या भरतीप्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय पोस्ट सेवा विभागातील ब्रांच पोस्ट मास्तर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर आणि पोस्ट सेवक पदांची भरती केली जाणार आहे. १८ वर्षे पूर्ण करणारा किंवा जास्तीत जास्त ४० वर्षे पूर्ण केलेला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे. 

या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयांत तो उत्तीर्ण असल्यास उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. तसंच पहिल्या प्रयत्नात त्यानं दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक असल्याचंही जाहिरातीत म्हटलं आहे.

 पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या दहावीतील गुणांच्या आधारावर यादी तयार केली जाणार असल्याचंही यात म्हटलं आहे. इच्छुक उमेदवार पोस्ट खात्याच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in किंवा appost.in/gdsonline  वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment