राशीन : कर्जत तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त भागास भेट देऊन खा. डॉ. सुज़य विखे यांनी पाहणी केली.
या वेळी नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून त्यांना महिनाभरात मदत मिळवून देण्याचे आश्वासन खा. विखे यांनी दिले. कर्जत तालुक्यातील भांबोरा येथून आज सकाळी खा. विखे यांच्या दौऱ्यास प्रारंभ झाला.
या वेळी त्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील भागास भेट दिली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. येथील हनुमान मंदिरासमोर शेतकऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली.
या वेळी सभापती साधना कदम, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, राशीनचे जि. प. सदस्य कांतीलाल घोडके, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक शहाणे, रिपाइंचे तालुकाप्रमुख संजय भैलुमे, संजय सुद्रिक, अशोक पावणे यांच्यासह पंचायत समितीचे कृषी अधिकारी रुपचंद जगताप कृषी विभागाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
त्यानंतर गणेशवाडी, करमणवाडी, खेड शिंपोरा, मानेवाडी, करपडी येथील भागास विखे यांनी भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले.