अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करावे व त्यांना देखील कोरोना काळात 50 लाखाचा विमा संरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. महाराष्ट्रात कोरोनाच्या उद्रेकाच्या पहिल्या लाटेपासून जीवाची पर्वा न करता पत्रकार ग्राऊंड लेवलवर कार्यरत आहे.
कोरोनाच्या संकटकाळात मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. कोरोना विरुध्दच्या संघर्सात पत्रकारांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. अनेक पत्रकार कोरोनाने बाधित झाले तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
अशा परिस्थितीत देखील पत्रकारांनी आपले कार्य सुरु ठेवले आहे. जीव धोक्यात घालून पत्रकार सर्वसामान्यांना बातमीसह प्रशासन व सर्वसामान्य नागरिकांमध्ये दुवा म्हणून महत्त्वाचे कार्य करत आहे. पत्रकार हे सातत्याने बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असतात.
त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही हा धोका असल्याचे निवेदनात जहागीरदार यांनी म्हंटले आहे.
तामिळनाडू, मध्यप्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल व आंध्र प्रदेश या राज्यातील सरकारने पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा देऊन, त्यांचे लसीकरण करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तरी महाराष्ट्र सरकारने सदर निर्णय घेऊन पत्रकारांना न्याय देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|