अहमदनगर : राज्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले असून, ओल्या दुष्काळाने संकटात सापडलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रति हेक्टर ५० हजार रूपयांची मदत नूकसान भरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसदेत केंद्र सरकारच्या मदतीबाबतच्या अधिसूचनेवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेवून त्यांनी मदतीचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यात अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामुळे ३० जिल्ह्यातील पिकांचे मोठया प्रमाणात नूकसान झाले.
३२५ गावामधील नुकसानीचे आलेली आकडेवारी पाहाता सुमारे ५४.२२ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याकडे लक्ष वेधून खा. डॉ. विखे म्हणाले की, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील मध्य महाराष्ट्राबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातही द्राक्ष, सोयाबीन, कांदा, कापूस, मका बाजरी, तांदूळ या पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.
सरकारने या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेवून तसेच संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी प्रति हेक्टर ५० हजार रूपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.













