MP Sujay Vikhe Patil – नगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी स्व. दिलीप गांधी प्रेरित सहकार पॅनलच्या सर्व 18 उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती करून करण्यात आला. यावेळी माळीवाड्या पासून ढोल ताश्यांच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली काढण्यात आली. याप्रसंगी खासदार सुजय विखे यांनी मतदारांना एक आवाहन केले आहे.
अर्बन बँकेच्या पुढच्या चांगल्या भविष्यासाठी दिलीप गांधी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वांनी मोठ्या मनाने सहकार पॅनलला साथ द्यावी, असे आवाहन खा.सुजय विखे पाटील यांनी केले. स्व. दिलीप गांधी यांनी मदत केली नसती तर मीही खासदार झालो नसतो ही वास्तविकता नाकारता येणार नाही. ज्या पद्धतीने गांधी कुटुंबीय माझ्या मागे उभे राहिले त्याच प्रमाणे विखे कुटुंब गांधी परिवारा मागे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पुढे बोलताना विखे म्हणाले, स्व.दिलीप गांधी यांचे नगरच्या विकासासाठी व अर्बन बँकेच्या विकासा बरोबरच प्रत्येक कार्यकर्ता उभा करण्यात मोठे योगदान आहे. अर्बन बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार दिला. आज जरी ते नसतील तरी तरी त्यांचे अस्तित्व कायम टिकून आहे. नगरमध्ये उद्योजकता निर्माण करण्यासाठी, नवीन पिढीला उद्दोग धंद्यांची जोड देण्यासाठी स्व.दिलीप गांधी यांनी केलेले काम सुवेंद्र गांधी यापेक्षा अधिक पुढे नेतील असा मला विश्वास आहे.
सहकार पॅनलचे उमेदवार
दीप्ती गांधी, अनिल कोठारी, शैलेश मुनोत, राजेंद्र अग्रवाल, ईश्वर बोरा, राहुल जामगावकर, महेंद्र गंधे, संपत बोरा, गिरीश लाहोटी, अजय बोरा, अशोक कटारिया, अतुल कसट, कमलेश गांधी व सचिन देसर्डा, मनेश साठे, संगीता गांधी, मनीषा कोठारी यांचा समावेश आहे.