मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरेंसोबतच (Raj Thackeray) भाजपाचाही (Bjp) समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना ते भोंग्यांचा विषय संपला असून त्याचं दळण दळत बसू नका असा सल्ला दिला आहे.
यावेळी राऊत म्हणाले, भोंग्यांचा विषय संपला आहे. त्याचं दळण दळत बसू नका. महाराष्ट्र (Maharashtra) शांत आहे. कोण काय करतंय आणि कुणाच्या सांगण्यावरून करतंय हे लोकांना कळतंय, असे ते म्हणाले आहेत.

तसेच राऊत म्हणाले, अयोध्येत (Ayodhya) जाण्याचा निर्णय शिवसेनेने केला आहे, हा प्रश्न चुकीचं आहे. शिवसेनेना नेहमी अयोध्येत गेली आहे. आमचं अयोध्येशी नातं आहे.
हा केवळ निवडणुकीचा भाग नाही. राजकीय षडयंत्र नाही. जेव्हापासून अयोध्येचं प्रकरण सुरू झालं तेव्हापासून शिवसेना आणि अयोध्येच भावनिक नातं आहे.
जेव्हा सरकार नव्हतं, तेव्हाही आम्ही जात होतो. महाराष्ट्रात सरकार झाल्यावर मुख्यमंत्री दोनदा अयोध्येला गेले आहेत. यात्री निवासचं काम आहे. त्याबाबतची आम्ही घोषणा केली होती. बरेच कामे आहेत तिथे. आमचं मन साफ आहे.
आम्ही राजकीय फायद्यासाठी करत नाही. आम्ही श्रद्धेसाठी करतो. कुणाला जायाचं जाऊ द्या. स्वच्छ मनाने जावं. राजकीय भावनेने जाऊ नका. राजकीय भावनेने जाणाऱ्यांना रामलल्ला मदत करत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावरून हा टोला लगावला असून कोण कुणाच्या स्पॉन्सरशीपने राजकारण करत असेल तर करू द्या. शिवसेना आपल्या ताकदीवर राजकारण करत आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.