अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी दुपारी पत्रकारांना दिली.कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्ह्यात आतापर्यंत दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
वारंवार आवाहन करुनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५मधील कलम ३० अन्वये विविध बाबींसाठी बंदी आदेश लागू केले आहेत.

हे आदेश आजपासून लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणायांवर दंडनीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव, मिरवणूक, उरुस आदींना मनाई राहील. जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल्स अथवा अन्य वास्तूंमधील मॅरेज हॉल तसेच अन्य विवाह स्थळांच्या ठिकाणांचा वापर करण्यास बंदी राहील.
जिल्ह्यात कार्यशाळा, मेळावा, सभा, मोर्चा, आंदोलन, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग यांच्या आयोजनास बंदी राहील. मंदिर, मशिद, गुरुव्दारा, चर्च व इतर धार्मिक स्थळे नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद राहतील.
जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असणारी दुकाने/सेवा आस्थापना, उपाहारगृहे/खाद्यगृहे/ खानावळी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालय, व्हिडिओ पार्लर, लॉटरी सेंटर आदी बंद राहतील.
जिल्ह्यातील सर्व परमिट रुम बिअरबार बंद ठेवण्यात येत आहेत. सर्व नागरिकांना विहीत कारणाशिवाय अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com