Farmer Scheme : भारतीय शेतीमध्ये आता काळाच्या ओखात बदल केले जात आहेत. तसेच शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रेरित केले जात आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे या अनुषंगाने शासनाकडून वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत.
कृषी ड्रोन हे देखील एक नवीन तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमधील वेगवेगळ्या अडचणींचा सामना करता येणार आहे. कृषी ड्रोनच्या मदतीने शेतकरी बांधवांना पिकांवर औषध फवारणी वेळेत आणि काटेकोरपणे करता येणार आहे. शिवाय यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर देखील कोणता दुष्परिणाम होणार नाही.
तूर्तास याचा उपयोग औषध फवारणीसाठी होत असला तरी देखील भविष्यात कृषि ड्रोनच्या मदतीने वेगवेगळे नवनवीन फीचर्स अद्ययावत करण्यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत घेत आहेत. दरम्यान कृषी ड्रोन खरेदी करणे हे शेतकऱ्यांसाठी परवडणार नाही. यामुळे शासनाकडून कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शासन केवळ अनुदानच देत नाही तर कृषी ड्रोन चालवण्यासाठी प्रशिक्षण देखील देत आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी ड्रोन अनुदान योजना संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ही कृषी ड्रोन खरेदी करायचे असेल तर ही बातमी विशेष तुमच्यासाठी आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की शेतकऱ्यांना कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाकडून 50 टक्क्यांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना निम्म्या किमतीत ड्रोन खरेदी करता येणार आहे. कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी शासनाकडून 50% अनुदान किंवा पाच लाख पर्यंतची मदत दिली जात आहे.
कृषी ड्रोन अनुदान योजना नेमकी आहे तरी कशी
आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत, ड्रोन खरेदीसाठी 50% अनुदान किंवा जास्तीत जास्त पाच लाख रुपये अनुदान पदवीधर सुशिक्षित तरुण, अनुसूचित जाती जमाती, लघु व सीमांत, महिला आणि ईशान्येकडील राज्यांतील शेतकऱ्यांना देण्याची तरतूद आहे. तसेच इतर शेतकऱ्यांना मात्र ड्रोन खरेदीसाठी 40 टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त चार लाख रुपये देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.
तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ प्रशिक्षण व चाचणी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, आयसीएआर संस्था आणि राज्य कृषी विद्यापीठ यांना देखील देण्यात आला आहे. या संस्थांना ड्रोन खरेदीवर १०० टक्के अनुदान देण्याचे प्रावधान सदर योजनेत नमूद आहे.
प्रशिक्षण देखील शासनाकडून दिल जाणार बर
शेतकरी बांधवांना केंद्र शासनाकडून केवळ ड्रोन खरेदीवर अनुदान मिळते एवढेच नाही तर ड्रोन कसं चालवायचं, याचा वापर कशा पद्धतीने करावा लागतो? या सर्व गोष्टींमधील बारकावे देखील शासनाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या संस्थांमध्ये शेतकऱ्यांना शिकवले जात आहेत. शेतकरी आणि सुशिक्षित तरुणांना केंद्र सरकारच्या कृषीयंत्रणा प्रशिक्षण व चाचणी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, आयसीएआर संस्था आणि राज्य कृषी विद्यापीठांकडून ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
साहजिकच, कृषी ड्रोन हाताळण्यासाठी प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाने फक्त अनुदान देण्याची तरतूद केली आहे असे नव्हे तर या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देखील उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून भारतीय शेतकरी आता हायटेक बनू पाहत आहे.