Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान देण्यात आले होते.
त्यानंतर देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी जोर धरू लागली होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे आणि औरंगाबाद विभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शेतकरी राजाने अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक ऐन काढणीच्या वेळी वाया गेले. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना भरीव अनुदान दिले जावे अशी मागणी केली जात होती. या अनुषंगाने पुणे व औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्तांनी शासनाकडे नुकसान भरपाईची पत्राद्वारे मागणी केली होती.
पुणे विभागीय आयुक्तानी 19 ऑक्टोबर 2022 रोजी तर औरंगाबाद विभागातील विभागीय आयुक्तांनी 4 नोव्हेंबर 2022 रोजी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई दिली जावी यासाठी पत्र लिहिले होते. या दोन्ही विभागीय आयुक्तांनी पत्राच्या माध्यमातून 128674.66 लाख रुपयांचा निधी या दोन विभागासाठी मागितला होता.
तत्सम प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता, विभागीय आयुक्तांनी मागणी केलेला निधी शासनाकडून वितरित करण्यात आला आहे. यासाठी शासनाकडून 17 नोव्हेंबर 2022 रोजी एक शासन निर्णय काढून पुणे आणि औरंगाबाद विभागातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी 128674.66 लाख रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण शासनाने काढलेल्या शासन निर्णयात कोणत्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार तसेच किती निधी मिळणार आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
शासन निर्णयातील महत्त्वाच्या बाबी
सप्टेंबर व ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिकांच्या नुकसानीसाठी एकूण रु. १२८६७४.६६ लक्ष (अक्षरी रुपये बारशे श्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लक्ष सहासष्ट हजार फक्त) इतका निधी विभागीय आयुक्त, पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना किती मिळणार मदत
शेती पिकाच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत महसूल व वन विभागाचा दि. २२.८.२०२२ रोजी निर्गमित झालेल्या शासनाच्या निर्णयानुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे दर अनुक्रमे रु.१३,६००/-, रु.२७,०००/- व रु.३६,०००/- प्रमाणे ३ हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करुन निधी वितरीत करण्यात येणार आहे.
या जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणार मदत
पुणे विभागातील पुणे सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 7202.08 लाख रुपये आणि औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यांसाठी 121472.58 लाख इतका निधी वितरित होणार आहे. म्हणजेच पुणे आणि औरंगाबाद विभागासाठी बारशे श्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लक्ष सहासष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.