अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोटातील लव्हाळवाडी गाव भर पावसाळ्यात तहानलेले असून उशाला धरणाचे पाणी असुनही महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेण्याची वेळ आली आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात लव्हाळवाडी ही ठाकर समाजाची वाडी आहे. शिंगणवाडी व लव्हाळवाडी अशी गृप ग्रामपंचायत या वाड्यांसाठी आहे. मुळातच या ग्रामपंचायतवर गेल्या दशकभरापासून प्रशासक आहे.

याची कल्पना गावकऱ्यांनासुद्धा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतीवर नेमलेला दुसरा अधिकारी म्हणजे ग्रामसेवक. हे अधिकारीही आठवडामंत्री असल्याने नागरीकांच्या मुलभूत सुविधेकडे दुर्लक्षच असते.
शिंगणवाडी गावासाठी पाण्याची मुबलक सुविधा असून तेथील घरा घरामध्ये पाणी पोहोचले आहे. त्यामुळे येथील नागरीकांना पाणी सहज उपलब्ध होते. या उलट लव्हाळवाडीची अवस्था आहे.
अगदी उशाला धरण दिसते; मात्र पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण या वाडीत आहे. लव्हाळवाडीतील नागरीकांसाठी काही वर्षांपूर्वी एक पाण्याची टाकीही बांधली गेली होती; परंतु त्या टाकीमध्ये कधी पाणीच पडले नाही.
टाकीची पाईपलाईन ही फक्त दिखावा ठरली. पाण्याच्या टाकीला नळच नाहीत. त्यामुळे भर पावसात येथील महिलांच्या डोक्यावर हंडा आला आहे. कुठेतरी डोंगराच्या झुरीवरुन हंडा भरुन आणायचा किंवा लांबवर पायपिट करून धुक्यामध्ये वाट शोध तळं गाठायचं किंवा ओढ्यामधील बिगर काठाच्या विहीरीवरुन पाणी आणायचं, हे येथील महिलांना कायमचं झालंय.
येथील नागरीक व महिलांनी येथील ग्रामपंचायतीचा कारभार पाहणाऱ्या ग्रामसेवकांना या संदर्भात अनेकदा सांगितलं; परंतु ग्रामसेवक आठवड्यातुन एकदाच तालुक्याच्या गावातुन लव्हाळवाडी व शिंगणवाडीला येत असल्याने ते पावसाळा संपला की लगेच मोटार आणु असे आश्वासन देऊन मोकळे होतात.
आतापर्यंत बरेच पावसाळे लव्हाळवाडीसाठी निघून गेलेत; मात्र लव्हाळवाडीतील महिलांची पावसाळ्यातील पाण्यासाठी पायपीट काही थांबताना दिसत नाही. आदिवासी भागातील शिंगणवाडी- लव्हाळवाडी ही गृप ग्रामपंचायत पेसा ग्रामपंचायत आहे.
मोठ्या प्रमाणात या पेसा ग्रामपंचायतला निधी येत असतो. मग हा निधी कुठे जातो? या निधीतुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था का होऊ शकत नाही? आणखी किती वर्ष या महिलांच्या डोक्यावर पाण्याचा हंडा राहणार? असे अनेक प्रश्न या ठाकर समाजाच्या लोकांसमोर उभे आहेत.