Maharashtra Government Scheme : राज्यातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यात लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच मोठी आहे. दरम्यान याच लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी शासनाच्या माध्यमातून आता एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महायुती शासनाने ही योजना सुरू केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री श्रीमान एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यात ही योजना सुरू झाली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या नव्या योजनेबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या श्रद्धा, सुविधा आणि परवडणारा प्रवास यांचा सुंदर मेळ घालणारी एक महत्त्वाची योजना आता प्रत्यक्षात येत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन’ ही नवी तीर्थाटन योजना सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ही योजना राबविण्यात येत असून, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.
कशी आहे नवी योजना?
ही योजना केवळ धार्मिक पर्यटनापुरती मर्यादित नसून, ती सामाजिक न्यायाची आणि सर्वसमावेशकतेची जाणीव ठेवणारी आहे. ‘स्वस्त आणि सुरक्षित’ या ब्रीदवाक्यावर आधारित असलेली ही योजना सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाचा अनुभव देणार आहे.
श्रद्धास्थळी जाण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते, मात्र खर्च, सोय-सुविधा आणि सुरक्षिततेअभावी ती पूर्ण होत नाही. अशा भाविकांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरणार आहे.
या योजनेत राज्य शासनाने एसटी प्रवासासाठी जाहीर केलेल्या सर्व सामाजिक सवलती कायम राहणार आहेत. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाच्या मूळ दरात ५० टक्के सवलत मिळणार असून, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.
प्रत्येक आगारातून ४० प्रवाशांचा गट तयार करून सहली आयोजित केल्या जातील. यासाठी एसटीच्या नव्या, सुरक्षित आणि आरामदायी बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
केव्हापासून होणार योजनेची अंमलबजावणी ?
२३ जानेवारी २०२६ पासून राज्यातील २५१ आगारांत ही योजना एकाच वेळी सुरू होणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येक आगारातून किमान पाच बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असून, दररोज सुमारे १,००० ते १,२५० विशेष धार्मिक व पर्यटन बसगाड्या धावतील. त्यामुळे राज्यातील धार्मिक पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे.
अष्टविनायक दर्शन, ११ मारुती दर्शन, पंढरपूर-अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर-पन्हाळा-जोतिबा, गणपतीपुळे, शेगाव, शिर्डी अशा विविध श्रद्धास्थळांच्या सहली या योजनेअंतर्गत आयोजित केल्या जाणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त सुरू होत असलेली ही योजना लाखो भाविकांसाठी श्रद्धेचा, सुरक्षिततेचा आणि समाधानाचा प्रवास ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













