बिग ब्रेकिंग : बाळासाहेब थोरात देणार राजीनामा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बदलल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

थोरात आज राजधानी दिल्लीत असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं समजतं. प्रदेशाध्यक्षपदी कोण? काँग्रेसप्रदेशाध्यक्षपदी राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची नावं चर्चेत असल्याचं समजतं. याबाबतचा निर्णय या महिन्यातच अपेक्षित आहे.या सर्व नेत्यांच्या नावांमध्ये राजीव सातव यांचं नाव आघाडीवर आहे.

मंत्रिपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद एकाच व्यक्तीकडे नको अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. दरम्यान, येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. जून २०१९ मध्ये बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता.

सरकारमधील जबाबदारी आणि पक्षातील इतर जबाबदारी असल्याने आणि नवीन चेहर्‍याला संधी मिळावी म्हणून प्रदेशाध्यक्ष सोडण्याची इच्छा बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली आहे.काँग्रेसमध्ये पहिल्यांदा बाळासाहेब थोरात यांच्याकडे दोन पद आहेत.

प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे विधीमंडळ पक्ष नेते अशी दोन पदं थोरात सांभाळत आहेत. दोन स्तरावर काम करताना त्यांना कसरत करावी लागत आहे. राज्यातील काँग्रेसला पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष मिळावं अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरु होती, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्यापेक्षा स्वत:हून या पदातून मुक्त होण्याची तयारी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आहे.

त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. थोरातांच्या नेतृत्वात काँग्रेसने मागील विधानसभा निवडणुकीत ४४ जागा जिंकल्या होत्या,

त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यातही त्यांची भूमिका निर्णायक होती, प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचा बाळासाहेब थोरात यांची भूमिका असली तरीही हायकमांड काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment