विविध कारणांमुळे विद्युत रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. रोहित्र नादुरुस्त होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सुजय उपाध्ये यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी आणि जोर्वे येथील शेतकरी व ग्रामस्थांची बैठक कोल्हेवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नुकतीच घेण्यात आली.
यावेळी प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन राहुल दिघे अध्यक्षस्थानी होते. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हेवाडी आणि जोर्वे येथील रोहित्रे बंद होते.
हे रोहित्र नादुरुस्त का होतात, या विषयी महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता सुजय उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले, रोहित्र नादुरुस्त होण्यास शेतीपंप मोटरचे बॉडी अर्थ असणे हे प्रामुख्याने मोठे कारण आढळून येते. एका नादुरुस्त रोहित्रावर साधारण ३० ते ५० टक्के मोटर या बॉडी अर्थ झालेल्या आढळून येतात.
त्यासोबतच थ्री फेज मोटरसाठी सिंगल, टू-फेज स्टार्टर वापरणे, शेतीपंपांना कॅपॅसिटर न बसविणे, सर्विस वायर किंवा केबल खराब अथवा शॉर्ट असणे, अर्थिंग न करण्यामुळे देखील रोहित्रावरील दबाव वाढून रोहित्र जळते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. यावेळी महावितरण मार्फत रोहित्र नादुरुस्ती टाळण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर रोहित्र नादुरुस्त टाळण्यासाठी वि. वि. का. सोसायटी मध्ये कॅपीसिटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या मेळाव्यास अॅड. जगन्नाथ वामन, बंडू गुंजाळ, मोहन वामन, अमोल दिघे, लक्ष्मण कोल्हे, शिवाजी काळे, बाळासाहेब खुळे, अशोक वामन, पुंजाहरी गुंजाळ, शिवाजी काळे, गणपत खुळे आणि इतर मान्यवर शेतकरी उपस्थित होते.
तसेच महावितरण कर्मचारी अशोक सोनवणे, कैलास कोल्हे, संजय इंगळे, संजय गेठे, आदिनाथ सानप यांच्यासह इतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.