वाहनाच्या संबंधी किंवा ट्रॅफिकचे जर आपण नियम पाहिले तर यामध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे नियम असतात. जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला वाहतुकीच्या अनेक महत्त्वाच्या अशा नियमांचे पालन करणे गरजेचे असते.
आपण पाहिले असेल की जेव्हा आपण रस्त्यावर प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला रस्त्यावर अनेक प्रकारच्या मार्किंग केलेल्या दिसून येतात. तसेच काही बोर्डवर देखील वेगवेगळ्या प्रकारच्या मार्किंग असतात. या सगळ्या मार्किंगचा अर्थ हा वेगळा असतो
व यामधून वाहतुकीचे काही नियम प्रवाशांना सांगण्याचा हा एक प्रयत्न असतो. अगदी त्याच पद्धतीने आपण जर अनेक वाहने पाहिली तर वाहनांची जी काही नंबर प्लेट असते ती देखील वेगवेगळ्या रंगाची असते.
परंतु आपल्याला माहितीच नसते की या वेगवेगळ्या रंगाच्या असलेल्या नंबर प्लेटचा अर्थ देखील वेगवेगळ्या होत असतो.
त्यामुळे याबद्दल माहिती असणे देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने या लेखामध्ये आपण कोणत्या रंगाच्या नंबर प्लेटचा नेमका अर्थ काय होतो? याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत.
कोणत्या रंगाच्या नंबर प्लेटचा काय होतो अर्थ?
1- पिवळ्या रंगाची नंबर प्लेट- आपण बऱ्याच वाहनांवर नंबर प्लेट पाहतो व ती पिवळ्या रंगाची असते. जर आपण पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेटचा अर्थ पाहिला तर व्यावसायिक वाहतूक करणारे जे काही वाहन आहे त्या वाहनाला ही पिवळ्या रंगाचे नंबर प्लेट देण्यात येते.
साधारणपणे ही नंबर प्लेट आपल्याला ट्रक आणि बस किंवा कार, टॅक्सी आणि ऑटो रिक्षा यांना पाहायला मिळते. अशा प्रकारचे नंबर प्लेट असणारे जे काही वाहने आहेत त्याच्या ड्रायव्हर कडे व्यावसायिक वाहन चालवण्याचा परवाना असणे गरजेचे आहे.
2- पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट- खाजगी वापरासाठी जर वाहन घेतले असेल तर या वाहनाची नंबर प्लेट ही पांढरी असते. जास्त करून कार साठी अशा प्रकारचे नंबर प्लेट असते.
या रंगाची नंबर प्लेट असलेले वाहन फक्त खाजगी आणि वैयक्तिक वापरासाठी वापरले जाते. पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट असलेल्या वाहनाचा वापर तुम्ही भाड्याने देण्यासाठी करू शकत नाहीत.
3- काळ्या रंगाची नंबर प्लेट– काळी नंबर प्लेट असेल तर ही वाहने तुम्ही व्यावसायिक कामासाठी वापरू शकतात. परंतु या रंगाची नंबर प्लेट असलेली वाहने चालवण्यासाठी तुमच्याकडे व्यावसायिक वाहन चालवण्याचा परवाना असणे गरजेचे नाही.
4- हिरव्या रंगाची नंबर प्लेट- हिरव्या रंगाची नंबर प्लेट प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहनांना दिली जाते व ही वाहने तुम्ही खाजगी वापरासाठी करू शकतात. अशा प्रकारच्या नंबर प्लेटमध्ये हिरव्या रंगावर पांढऱ्या अक्षरांमध्ये नंबर नमूद केलेला असतो.
याव्यतिरिक्त व्यावसायिक रीतीने वापरण्यात येणारी जी काही इलेक्ट्रिक वाहने असतील त्या वाहनांच्या हिरव्या नंबर प्लेटवर पिवळ्या अक्षरांमध्ये नंबर असतो
5- निळ्या रंगाची नंबर प्लेट- या रंगाची नंबर प्लेट प्रामुख्याने विदेशी अधिकाऱ्यांसाठी राखीव असलेले जे वाहन आहेत त्यांनाच असते.
निळ्या रंगाच्या नंबर प्लेटवर पांढऱ्या अक्षरांमध्ये नंबर असतो. या रंगाच्या नंबर प्लेटवर राज्याचा कोड दिलेला नसतो व त्या ऐवजी प्रामुख्याने सीसी, डीसी आणि युएन असं लिहिलेले असते.
6- बाणाचे चिन्ह असलेली नंबर प्लेट- आपण बऱ्याचदा अशी अनेक वाहने पाहतो की त्यांच्या नंबर प्लेटवर बाणाची खूण असते. आकाशाच्या दिशेने बाणाचे टोक असलेले निशाण असते.
सर्वसामान्यपणे सैन्य दलाकडील वाहनांना बाणाचे खूण असलेली नंबर प्लेट देण्यात येते. ही नंबर प्लेट असलेल्या वाहनांना संपूर्ण देशामध्ये टोल टॅक्स लागत नाही.
7- लाल रंग असलेली नंबर प्लेट– एखादे वाहन आपण अलीकडच्या काळात किंवा नुकतेच खरेदी करतो अशा वाहनांना ही नंबर प्लेट दिली जाते. ही तात्पुरत्या स्वरूपाची नंबर प्लेट असते.
अशाप्रकारे वेगवेगळ्या रंगांच्या नंबर प्लेट चे वेगवेगळे अर्थ होतात.