अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. अहमदनगरमध्येही कोरोनाने उग्र रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे.
परंतु या प्रसंगात कोरोनाला घाबरून घरात न बसता जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. रोहित पवार हे मतदार संघात फिरत आहेत. थेट जनसामान्यांच्या प्रश्नांना भिडत आहेत. कोरोनाचे संकट आहेच.
ते आणखी वाढतेय. पण म्हणून इतर प्रश्न संपलेत असे नाही. ग्रामीण भागात तर कोरोनापेक्षाही हे प्रश्न ग्रामस्थांना अधिक गंभीर वाटतात. कोरोनाच्या उपाययोजनांत गुंतलेल्या यंत्रणेचे या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.
अशा परिस्थितीत कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार मतदारसंघात फिरत आहेत. गावोगावी, वाड्या वस्त्यांवर जाऊन लोकांना धीर तर देत आहेतच, शिवाय रखडलेले प्रश्न मार्गी लावत आहेत.
कुकडीच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्यांचा प्रश्न, युरिया मिळत नाही, वीज पुरवठा खंडित होतोय असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण भागात आहेत.
त्यामुळे आपली लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी ओळखून रोहित पवार यांनी मतदारसंघात तळ ठोकला आहे. कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण, कुळधरण, राक्षसवाडी, बारडगाव दगडी,
पिंपळवाडी, करमनवाडी, करपडी, परीटवाडी, चिलवडी, राशीन, सोनाळवाडी, कोळवडी, अळसुंदे, धांडेवाडी, आंबीजळगाव, म्हाळंगी, लोणी मसदपुर,
कोरेगाव, दिघी, निमगाव-डाकु अशी गावे आणि वाड्या वस्त्या त्यांनी पिंजून काढल्या. तेथे ग्रामस्थांच्या भेटी घेऊन अडचणी ऐकून घेतल्या. शक्य त्या लगेच मार्गी लावल्या. उरलेल्यांसाठी सरकारी यंत्रणेला सूचना केल्या.
-
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा