अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. यामुळे जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.
यातच जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावाने कोरोनमुक्तीचा संदेश देत जनजागृती केली. आता त्याच अनुषंगाने गावपातळीवर कोरोनामुक्तीची मोहीमच सुरु झाली.
नुकतेच पारनेर तालुक्यातील १३०० लोकसंख्या असलेले पळवे बुद्रुक हे गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे.
काॅन्टॅक्ट ट्रेसींग आणि ग्राम दक्षता समितीने संशयीत तपासणीमध्ये सातत्य ठेवल्याने मेअखेर गावातील केवळ दोन रुग्णांवर उपचार सुरू असून, नव्याने एकही रुग्ण गावात आढळून आलेला नाही, असे ग्रामसेवक गणेश घुले यांनी सांगितले.
शहरातील काेरोना गावखेड्यात पोहाेचल्यानंतर पळवे बुद्रुक गावात एप्रिल महिन्यात ३२ रुग्ण आढळले होते.
ग्राम दक्षता समितीने ज्या घरात रुग्ण आढळेल, त्यामधील व शेजारील २० जणांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
प्रत्येकाची तपासणी करून कोरोना संख्या वाढू न देण्यावर समितीने भर दिला. मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या अवघी दहावर आली. मे अखेर ती फक्त दोन रुग्णांवर उपचार सुरू होते.
आता मागील आठवड्यात गावात एकही रुग्ण न आढळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला, तसेच ग्राम दक्षता समितीच्या या नियोजनाचे कौतुक केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम