अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो संगमनेर तालुक्यातील पूर्वेकडील साकूर-आश्वी रस्त्यावर पानोडी घाटात पलटी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, खांबे येथे विवाह सोहळा झाल्यानंतर नवरदेवाकडील आदिवासी समाजातील वऱ्हाडी टेम्पोत बसून राहता तालुक्यातील रामपूर गावाकडे परत जात होते.
पानोडी घाट माथ्यावरील वळणदार रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात असणाऱ्या टेम्पोने रस्त्या शेजारील खड्ड्यात जाऊन पलटी झाला. टेम्पोमध्ये महिला, लहान मुले व तरुण असल्याने मोठा गोंधळ उडाला.
या अपघातात महिला, लहान मुले व तरुणांना मुका मार लागला. अपघाताचे वृत्त परिसरात समजल्याने श्री गजानन महाराज शुगर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यानी घटनास्थळी धाव घेऊन मदत काय॔ सुरू केले.
आश्वी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सहा जणांना गंभीर मार लागल्याने त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.