मुंबई :- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्तांतर अटळ असून, काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तातडीने धान्यला २५०० रूपये प्रती क्विंटल इतका भाव जाहीर केला जाईल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जाहीर केले आहे.
भंडारा येथे जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, आ. गोपालदास अग्रवाल, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार आशिष देशमुख, सेवक वाघाये, मुनाफ हकिम, प्रदेश काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आदी नेते प्रामुख्याने उपस्थित होते.
जनसंघर्ष यात्रेचे भंडारा येथे आगमन झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून विशाल मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर एका भरगच्च सभेमध्ये काँग्रेसच्या सर्वच वक्त्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर चौफेर हल्ला चढवला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरीविषयक समस्यांचा उहापोह केला.
ते म्हणाले की, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना आश्वासनांपलिकडे काहीच मिळाले नाही. शेजारच्या छत्तीसगडमध्ये धानाला २५०० रूपयांचा भाव मिळत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची केवळ १७००-१८०० रूपयांवर बोळवण का केली जाते आहे? अशी संतप्त विचारणा त्यांनी केली.
सरकारने शेतकऱ्यांना धानाची जाहीर झालेली मदत दिली नाही. धानाला हमीभाव दिला नाही. बोनस दिला नाही. कर्जमाफी झाली नाही. दुष्काळात मदतही दिली नाही. या सरकारला शेतकऱ्यांप्रती संवेदना नसून, हे सरकार उलथवून लावल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.
काँग्रेसचे सरकार आल्यानंतर धानाला किमान समर्थन मूल्य २५०० रूपये दिले जाईल आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण स्वीकारले जाईल, अशी घोषणाही विखे पाटील यांनी केली.