अहमदनगर :- ‘नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार आहे. काँग्रेसला ही जागा सोडण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही’, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले आहे.
जयंत पाटील यांनी केलेल्या ह्या वक्तव्यामूळे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी नगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचे स्पष्ट केले.पदाधिकाऱ्यांशी बोलताना पाटील यांनी नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण करण्याचे व ही जागा आपण ताकदीने लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते.
दक्षिण नगर जिल्ह्याची बुथ रचना करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून २५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचेही आवाहन केले होते.
पाटील पुढे म्हणाले ‘राज्यातील ४४ जागांचे दोन्ही काँग्रेसचे जागा वाटप अंतिम झाले आहे. तीन-चार जागांचे वाटप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्तरावर होईल.
या जागांमध्ये नगर आहे की नाही, हे मी आता सांगू शकत नाही’. नगरची जागा काँग्रेसने मागितल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी सांगितले आहे तरी दोन्ही बाजूंनी काही मतदारसंघांच्या अदलाबदलीची मागणी आहे.
पण जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, त्यावर कोणी जाहीरपणे बोलायचे नाही, असे दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये ठरले आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.