Drumstick Processing:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी शेवग्याचे महत्व विशद करताना स्वतः देखील शेवग्याच्या पराठ्यांचा आहारात समावेश करतात अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते व त्यामुळे शेवग्याचे महत्त्व अनेक दृष्टीने किती महत्त्वाचे आहे हे विशद होते. तसे पाहायला गेले तर शेवगा आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असून यामध्ये विटामिन ए, तसेच सी व लोह सारखी खनिजे आणि गंधकयुक्त अमिनो ऍसिड आणि इतर महत्त्वाचे पोषक मूल्य असल्यामुळे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
शेवग्याच्या शेंगाच नाही तर शेवग्याच्या झाडाची पाने आणि शेंगांमधील बिया देखील पौष्टिक मूल्यांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या गोष्टींमुळे जर शेवग्यावर प्रक्रिया करून काही मूल्यवर्धीत पदार्थ तयार केले तर नक्कीच शेती सोबत लाखो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी या माध्यमातून निर्माण होऊ शकते.

शेवग्यापासून तयार करा हे पदार्थ
1- शेवग्याची पावडर– शेवग्याची पावडर तयार करण्याकरिता शेवग्याची छाटणी केल्यानंतर किंवा कापणी केल्यानंतर त्याची पाने काढून घ्यावी व सावलीमध्ये स्वच्छ धुवून त्यांना वाळवले जाते.सूर्यप्रकाशामध्ये पाने वाळवू नयेत कारण सूर्यप्रकाशात त्यातील जीवनसत्व ए नष्ट होऊ शकते.
हे वाळलेली पाने ग्राइंडर मध्ये दळून त्यांची पावडर बनवली जाते. या पावडरचा उपयोग पौष्टिक पदार्थ म्हणून दोन किंवा तीन चमचा पावडर सूप किंवा स्वासमध्ये वापरली जाऊ शकते. सूर्यप्रकाश आणि आद्रते पासून जर व्यवस्थित ठेवली तर 180 दिवसांपर्यंत तिची साठवणूक करता येते.
शेवग्याच्या पावडरला बाजारपेठेत खूप चांगली मागणी असल्याने यापासून चांगला पैसा मिळू शकतो. शेवग्याच्या पावडर पासून टॅबलेट आणि कॅप्सूल बनवता येतात व हे एक पूरक आहारामध्ये प्रथिनांच्या पूर्तते करिता वापरले जाऊ शकते. गोळ्या व कॅप्सूल स्वरूपामध्ये थेट सेवन करणे सोपे होते.
2- तेल– तेल हे बियाण्याचा मुख्य घटक असून त्याचे प्रमाण बियाण्याच्या वजनाच्या 36.7% असते. स्वालवंट एक्स्ट्रक्शन आणि कोल्ड प्रेस च्या माध्यमातून तेल काढता येते. याचा उपयोग सौंदर्यप्रसाधन उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच मॉइश्चरायझर आणि त्वचा कंडिशनर निर्मितीमध्ये देखील याचा वापर केला जातो.
केसांची व शरीराची उत्तम निगा ठेवण्याकरिता या तेलाचा वापर होतो व खाद्यतेलामध्ये देखील या तेलाचा वापर करता येतो. आयुर्वेदाचा विचार केला तर शेवग्याच्या तेलामध्ये अँटी ट्यूमर, अँटी पायरेटिक, अँटिऑक्सिडंट तसेच कोलेस्टेरॉल कमी करणे आणि अँटी फंगल असे अनेक गुणधर्म आढळून येतात.
3- शेवग्याचा रस– याकरिता ताजी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत व त्यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण मिक्सर मधून चांगले बारीक करून घ्यावे. त्यानंतर तयार मिश्रण गाळून घ्यावे व त्याचा रस काढावा. या रसाचे सेवन करण्या अगोदर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून एक चमचा मध टाकावे व त्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो.
मोठ्या प्रमाणात उत्पादन करायचे असेल तर शेवग्याच्या कोंबांना हॅमरमिलच्या साह्याने बारीक करून घ्यावे. त्यासाठी प्रति दहा किलो कोंबाकरीता एक लिटर या प्रमाणात पाण्याचा वापर करावा. नंतर ते गाळून पाण्याने आवश्यक तितके पातळ केले जाते व चवीनुसार साखर टाकावी. याला देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व असल्याने बाजारपेठेत चांगली मागणी असते.