पोकराअंतर्गत आली नवीन विहिरी योजना! शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मिळेल 100 टक्के अनुदान, वाचा ए टू झेड माहिती

Published on -

शेतीसाठी पाणी हा एक महत्त्वाचा घटक असून पाण्याशिवाय शेती शक्यच नाही. त्यामुळे शाश्वत पाण्याचा स्त्रोत किंवा शेतीला पाणी देता यावे याकरिता शेतकरी बंधू बोअरवेल तसेच विहिरी व अलीकडच्या काळापासून शेततळ्यासारख्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत.

पिकांसाठी किंवा शेतीसाठी सिंचनास मर्यादा येऊ नये या दृष्टिकोनातून विहीर किंवा बोरवेल्स यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जर शेतीला पाणी नसेल किंवा दुष्काळी भाग असेल तर अशा ठिकाणी पाण्यामुळे पिकांच्या उत्पादकतेत घट होते व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.

या अनुषंगानेच राज्यांमध्ये कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू करण्यात आलेली असून  या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता नवीन विहीर खोदण्याकरिता अनुदान देण्यात येते. या प्रकल्पामध्ये ज्या गावांचा समावेश करण्यात येतो त्या गावांमधील जे काही अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी आहेत

त्यांना हवामान बदलामुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सक्षम बनवणे व शेती करिता संरक्षित पाण्याची सोय निर्माण करून पीक उत्पादनात वाढ करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

 या योजनेअंतर्गत नवीन विहीर खोदण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाकरिता लाभार्थी निवडीच्या अटी

1- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या गावांची निवड केली जाते त्या गावाकरिता ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले जे अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी व अनुसूचित जाती/ जमाती तसेच महिला, दिव्यांग व इतर शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते.

2- या प्रकल्पांतर्गत जर विहिरीचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्याकडे असलेल्या एकूण जमिनीचे क्षेत्र हे 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

3- ज्या शेतकरी बंधूंकडे शेतीसाठी सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांना या माध्यमातून लाभ देण्यात येतो व ज्या शेतकऱ्यांनी अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना लाभ मिळत नाही.

4- यातील सगळ्यात महत्त्वाचे अट म्हणजे लाभार्थ्याची निवड करताना जी काही प्रस्तावित किंवा जे काही नवीन विहीर घेणार आहेत ती विहीर व पिण्याचा पाण्याचा सार्वत्रिक स्त्रोत यातील अंतर  पाचशे मीटर पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

5- तसेच महाराष्ट्र भूजल अधिनियम 2009 नुसार या योजनेअंतर्गत घेण्यात येणारी प्रास्ताविक विहीर व आधीच अस्तित्वात असलेल्या इतर विहिरी यामधील अंतर 150 मीटर पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

6- तसेच ग्राम कृषी संजीवनी समितीने ज्या लाभार्थ्यांना मान्यता दिलेली आहे त्यांच्या विहिरींसाठी स्थळ निश्चिती करिता भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील वरिष्ठ भू वैज्ञानिक यांच्याकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

7- नवीन विहीर खोदणे व अन्य बाबींची पूर्तता या कामांकरिता जास्तीत जास्त एक वर्षाचा कालावधी देण्यात येणार आहे.

 या नवीन विहिरी योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार?

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नवीन विहिरीची निर्मिती या घटकांतर्गत शंभर टक्के अनुदान दोन टप्प्यात देण्यात येणार आहे व यातील पहिला टप्पा म्हणजे विहिरीचे खोदकाम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ते काम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार एकूण खोदकामावरील खर्च व दुसरा टप्पा हा विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार देण्यात येईल.

या माध्यमातून शंभर टक्के अनुदान म्हणजेच अडीच लाख रुपये अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्याचे आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते.

 कुठे करू शकता अर्ज?

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा पात्र आणि इच्छुक शेतकऱ्यांनी https://dbt.mahapocra.gov.in या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज करावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!