मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत विधानसभा उपाध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश दिले आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखामध्ये न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हंटले आहे. तसेच भाजपवर सडकून टीका देखील केली आहे.
महाराष्ट्रातील सरकारच्या भवितव्याचा फैसला 11 तारखेस सर्वोच्च न्यायालयात होणार होता, पण फैसला पुढे ढकलण्यात आला. यामुळे कुणी आनंदाने हुरळून जाऊ नये व दुःखही करू नये. फैसला कधीही झाला तरी विजय सत्याचाच होईल याची खात्री महाराष्ट्राच्या जनतेला आहे. एक मात्र नक्की, महाराष्ट्रातील सध्याचे फडणवीस-शिंदे सरकार बेकायदेशीर आहे याबाबत कायदेतज्ञ व जनतेच्या मनात तीळमात्र शंका नाही, असे सामनामध्ये म्हंटले आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू होण्याआधीच शिंदे गटाचे काही आमदार ‘‘निकाल आमच्या बाजूनेच लागणार’’ असे हवाले आणि दावे करत होते. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत गंभीर दखल घ्यायला हवी. महाराष्ट्राचे सरकार कायदेशीर लढाईत फसले आहे हे तर नक्कीच. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, पण मंत्रिमंडळ नेमता आलेले नाही. कारण ज्यांना मंत्री व्हायचे आहे अशा अनेक आमदारांवर अपात्रतेची तलवार लटकताना दिसत आहे. तरीही अशा आमदारांना मंत्रीपदाची शपथ राज्यपाल देणार असतील तर देशात डॉ. आंबेडकरांची घटना उद्ध्वस्त झाली असे मानायला हरकत नाही, असे सामनामध्ये म्हंटले आहे.