रिअल इस्टेट

Rent Agreement : भाडेकरार 11 महिन्यांचाच का केला जातो ?

Published by
Ajay Patil

Rent Agreement:- बऱ्याचदा आपण जेव्हा शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने जातो तेव्हा आपण एखादा फ्लॅट किंवा घर भाड्याने घेतो व त्यामध्ये आपण राहायला लागतो. परंतु आपल्याला माहित आहे की, जेव्हा आपण एखाद्या घरात भाडेकरू म्हणून जातो तेव्हा त्या घराचा मालक आपल्याकडून भाडेकरार करून घेतो व हा करार फक्त अकरा महिन्यांसाठी केला जातो.

कारण भाडेकरार हा भाडेकरू आणि मालक यांच्यामध्ये असलेला एक महत्वपूर्ण दस्तऐवज असतो व घरमालक व भाडेकरू यांच्यातील कायदेशीर संबंध म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडतो.

परंतु बऱ्याचदा आपल्या मनामध्ये येते की भाडे करार हा बारा महिन्यांसाठी न करता 11 महिन्यांसाठीच का केला जातो? त्यामुळे यामागील प्रमुख कारण काय आहे? याची माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत.

 भाडे कराराचे महत्त्व

भाडेकरू आणि मालक यांच्यामध्ये भाडे करार केला जातो व तो दोन्ही पक्षांसाठी अटी आणि शर्तींचा उल्लेख केलेला एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. जेव्हा हा करार पूर्ण केला जातो तेव्हा त्यामध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्ती दोन्ही पार्टी म्हणजेच घराचा मालक आणि भाडेकरू यांना मान्य असतात असे मानले जाते.

विशेष म्हणजे घरमालक व भाडेकरू यांच्यामध्ये कायदेशीर संबंध म्हणून महत्त्वाची भूमिका भाडेकरार पार पाडत असतो. तसे पाहायला गेले तर अगोदर भाडे करार हा तोंडी किंवा परस्पर विश्वासावर केला जात असे. परंतु अनेक प्रकरणांमध्ये घरमालकाच्या विश्वासाला भाडेकरू कडून तडा दिला गेला व अनेक प्रकारचे गैरफायदा उचलण्याचे काम भाडेकरू कडून केले गेले.

काही प्रकरणांमध्ये तर घरमालकांना भाडेकरू कडून मालमत्ता खाली करून घेण्यासाठी कायदेशीर मार्ग देखील वापरावे लागले.तर काही दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याच्या प्रकरणांमध्ये तर भाडेकरूने मालमत्तावरच मालकी दाखवल्याचे प्रकार देखील घडले. त्यामुळे भविष्यात अशा काही मनस्तापापासून वाचण्याकरिता भाडे करार हा एक महत्त्वाचा असतो.

काही कारणामुळे जर भाडेकरू व घरमालक यांच्यामध्ये वाद झाला तर त्या वादावर तोडगा काढण्यासाठी महत्वाचा दस्तऐवज म्हणून भाडेकरार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. भाडेकरू कडून काही नुकसान झाले तर त्यासंबंधीचा दावा दाखल करण्यास घर मालकाला यामुळे मदत होऊ शकते.

 भाडेकरार 11 महिन्यांचाच का?

भाडेकरार 11 महिन्याचा असतो म्हणजेच एक वर्षापेक्षा कमी कालावधीचा असतो व त्यामुळे भाडे कराराची नोंदणी करण्याची गरज भासत नाही. जर आपण रजिस्ट्रेशन 1908 च्या कलम 17 अन्वये बघितले तर एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी भाडेपट्टी कराराची नोंदणी करण्याची आवश्यकता भासत नाही.

एक वर्षात कमी कालावधीचे भाडेकरार नोंदणी शिवाय पूर्ण केले जाऊ शकतात. याच कारणामुळे भाडेकरू व घरमालक 11 महिन्यांचाच भाडेकरार करतात. 11 महिन्यांचा भाडे कराराची नोंदणी करण्याची आवश्यकता भासत नाही व त्यामुळे नोंदणी करण्यासाठी आवश्यक मुद्रांक शुल्क भरण्याची गरज भासत नाही व त्यामुळे पैशांची बचत मोठ्या प्रमाणावर होते.

त्यामध्ये जर भाडे कराराची नोंदणीच करायची असेल तर मुद्रांक शुल्काची रक्कम हे आकारण्यात आलेले भाडे आणि कराराचा कालावधी यावरून ठरवली जात असते.

जितका जास्त काळ भाडेकरू घरामध्ये राहील तितके जास्त मुद्रांक शुल्क भरावे लागते. त्यामुळे कमी कालावधीमुळे मुद्रांक शुल्कातून बचत होते व त्यामुळेच भाडेकर 11 महिन्याचा केला जातो. परंतु यामध्ये नोंदणी करायची नसेल तर साधी नोटरी करून देखील दोघा पार्टीमध्ये हा करार करता येऊ शकतो.

Ajay Patil