अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- प्रादेशिक सहसंचालक व निबंधकांना वार्षिक लेखा परिक्षा अहवाल सादर न करताच सभासदांची ऑनलाईन सभा बेकायदेशीरपणे जाहीर करणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ सहकारी संस्था अधिनियम कलम ७५ (५) अन्वये तातडीने अपात्र करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी प्रादेशिक सह संचालकांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अशोक सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळाने दि. २७ रोजी ऑनलाईन सर्वसाधारण सभा होणार असल्याचे जाहीर केले आहे. वैधानिक लेखा परिक्षक यांच्याकडून आलेला सन २०२०-२१ चा वैधानिक लेखा परिक्षक अहवाल वाचून मंजुरी देण्यासाठी या बैठकीच्या अजेंड्यामधील विषय क्र. ५ मध्ये घेण्यात आला आहे.
मात्र प्रादेशिक सहसंचालक कार्यालयास १९ सप्टेंबर पर्यंत उपलब्ध झालेला नसल्याचे लेखी प्रादेशिक सह संचालकांकडून औताडे व युवराज जगताप यांना देण्यात आले आहे. मात्र लेखा परिक्षण अहवालाबाबतच्या कायद्यातील तरतुदींनुसार लेखा परिक्षण ३१ जुलै पर्यंत होणे बंधनकारक आहे.
त्याचप्रमाणे कोणत्याही परिसथितीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीची नोटीस देण्यापूर्वी प्रादेशिक सह संचालक, निबंधक व सभासदांना अहवालाची प्रत सादर करणे बंधनकारक आहे.
या मुदतीत जर अहवाल सादर न झाल्यास सहकारी संस्था अधिनियम कलम ७५ (५) अन्वये कारखान्याची जबाबदार संचालक मंडळास अपात्र ठविण्याचे अधिकार प्रादेशिक सह संचालकांना आहेत.
यानिमानुसार तातडीने कारखाना संचालक मंडळ अपात्र ठरवावे अशी मागणी या निवेदनाद्वारे औताडे यांनी केली आहे. निवेदनाची प्रत साखर आयुक्त पुणे यांना पाठविण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम