India News Today : देशासाठी आज एक चांगली बातमी आहे. भारताने (India) ऑस्ट्रेलियासोबत निर्यात (Export) दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वस्तुंना मोफत प्रवेश देखील मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. याचा फायदा व्यापार क्षेत्रावर होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाने शनिवारी ऐतिहासिक आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर (Economic cooperation and trade agreements) स्वाक्षरी केली.

भारताने एका दशकानंतर विकसित देशासोबत मुक्त व्यापार करार केला आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत वस्तू आणि सेवांची निर्यात दुपटीने वाढण्याची अपेक्षा आहे.
या करारानंतर, ऑस्ट्रेलिया आपल्या बाजारपेठेत कापड, चामडे, दागिने आणि क्रीडा उत्पादनांसारख्या 95 टक्के भारतीय वस्तूंना शुल्क मुक्त प्रवेश प्रदान करेल.
आभासी समारंभात करारावर स्वाक्षरी झाली
भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (piyush Goyal) आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक मंत्री डॅन तेहान (Dan Tehan) यांनी आभासी कार्यक्रमात या करारावर स्वाक्षरी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष स्कॉट मॉरिसन (Australian counterpart Scott Morrison) यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
पीएम मोदी म्हणाले
भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याचवेळी मॉरिसन म्हणाले की, या करारामुळे भारत-ऑस्ट्रेलिया संबंध अधिक दृढ होतील.
गोयल म्हणाले की, या करारामुळे दोन्ही देशांमधील 27 अब्ज डॉलरचा व्यापार पुढील पाच वर्षांत 45-50 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्यास मदत होईल.
भारतीय निर्यातदारांना फायदा होईल
या करारांतर्गत, ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसापासून भारताच्या निर्यातीच्या ९६.४ टक्के (मूल्याच्या दृष्टीने) शून्य शुल्क प्रवेश देईल. यामध्ये अशा अनेक उत्पादनांचा समावेश असेल, ज्यांवर सध्या 4-5 टक्के सीमा शुल्क आकारले जाते.
कापड आणि पोशाख, काही कृषी आणि मत्स्य उत्पादने, चामडे, पादत्राणे, फर्निचर, क्रीडासाहित्य, दागिने, यंत्रसामग्री, इलेक्ट्रिकल वस्तू आणि रेल्वे वॅगन्स यांच्याशी संबंधित उद्योगांना या कराराचा प्रामुख्याने फायदा होणार आहे.
आता होणार इतका व्यवसाय?
ऑस्ट्रेलिया हा भारताचा 17वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. त्याचबरोबर भारत हा ऑस्ट्रेलियाचा नववा सर्वात मोठा भागीदार आहे. 2021 मध्ये दोन्ही देशांमधील वस्तू आणि सेवांमधील द्विपक्षीय व्यापार $27.5 अब्ज इतका होता.