राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुक पोस्टद्वारे टीका करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाण्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात तिची चौकशी करून तिला अटक केली जाण्याची शक्यता आहे.
ठाणे पोलिसांनी चितळे हिला नवी मुंबईच्या कळंबोली येथून ताब्यात घेतले. सध्या कळंबोली पोलीस ठाण्यात केतकीच्या जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेचे पथक तिला ठाण्यात घेऊन येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

केतकी चितळेविरोधात आतापर्यंत ठाणे, पुणे आणि सातारा अशा तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तर अनेक ठिकाणी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतळी चितळे हिच्याविरोधात पोलिसांत तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. ठाणे आणि पुण्यात या तक्रारींच्याआधारे गुन्हाही दाखल करण्यात आला. केतकी चितळे हिने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.