Maharashtra News:काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंगे हटविण्यासाठी राज्यभर रान पेटविलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता पुन्हा आपल्या मराठी भाषेच्या मूळ मुद्द्यावर आले आहेत.
प्रसार भारतीच्या (दूरदर्शन) सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या हिंदी कार्यक्रमांना त्यांनी विरोध केला आहे. हिंदी कार्यक्रम बंद करून मराठी कार्यक्रम सुरू करावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराच ठाकरे यांनी प्रसार भारतीला दिला आहे.

या मागणीचे दूरदर्शनच्या अप्पर महासंचालकांना पाठवले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी हे पत्र अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांना दिले.त्यामध्ये म्हटले आहे की, सध्या या वाहिनीवर मराठीबरोबरच इतर भाषांमधील कार्यक्रमही प्रसारित केले जात आहेत.
त्यासंदर्भात सर्वसामान्यांच्याही तक्रारी आहेत. शोगाथा असो, सिनेमा गीते असो, पाककृती असो वा इतर कोणताही कार्यक्रम; मराठी भाषेत संवाद साधणारे असंख्य उद्योजक, कलावंत, साहित्यिक, अभिनेते आणि अगदी बल्लवाचार्यही महाराष्ट्रात आहेत.
त्यामुळे मराठी भाषेत कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी त्याची कमतरता नाही. याचे भान सह्याद्री वाहिनीसाठी कार्यक्रमांची निर्मिती आणि संबंधित नियोजन करणाऱ्यांनी खबरदारीने घेणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम वगळता अन्य कार्यक्रम मराठीतच सादर केले जावेत, असेही ठाकरे म्हटले आहे.