आज जागतिक वडापाव दिवस, ‘बॉम्बे बर्गर’ची जगभर ख्याती

Published on -

Vadapav News : आज २३ ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस आहे. वडपावचा जन्म १९६६ चा असल्याचे मानले जाते. दादर स्टेशन बाहेरील अशोक वैद्य यांच्या खाद्यगाडीवर वडापाव पहिल्यांदा बनला, असे मानले जाते.

आजच्या दिवशी लोकांनी पहिल्यांदा वडापावची चव चाखली होती. म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मुंबईत तयार झालेला आणि प्रसिद्ध पावलेला हा वडापाव जगात ‘बॉम्बे बर्गर’ म्हणून फेमस झाला आहे.

एवढेच नव्हे तर त्यावर अनेक जण पीएचडीही करीत आहेत. फक्त बटाट्याची भाजी आणि चपाती खाण्याऐवजी भाजीचा गोळा बेसनात घोळवून तळून पावासोबत खाल्यास अधिक स्वादिष्ट लागतो हे लक्षात आल्याने वडापावची सुरुवात झाली.

पहाता पहाता मुंबईच्या खाद्यसंसकृतीचा तो एक भाग बनला. मुंबईत वडापावची सुरुवात झाली तेव्हा त्याची किंमत फक्त १० पैसे इतकी होती. मुंबईतील दादर, लालबाग, परेल आणि गिरगांव येथील मिल मजूरांमुळे खरंतर वडापावला लोकप्रियता मिळाली.

१९७०-८० च्या काळात मुंबईमध्ये कापड मिल बंद झाल्या. त्यानंतर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या.

परवडणारे खाद्य म्हणून त्याची मागणीही वाढत गेली. पुढे जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. आज अगदी पाच रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो.

अमेरिकेच्या ऱ्होड आयलंडमधील ब्राऊन विद्यापीठात हॅरिस सॉलोमन हा तिशीतला विद्यार्थ्याने वडापाव या विषयावर पीएच.डी. केली आहे. लंडनमध्ये मुंबईतील रिझवी कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट २०१० रोजी वडापावचे हॉटेलच टाकले आहे.

सुजय सोहनी (ठाणे) आणि सुबोध जोशी (वडाळा) या दोघांनी सुरु केलेल्या श्री कृष्ण वडापाव नावाच्या या हॉटेलच्या उद्योगातून ते आज वर्षाला चार कोटींहून अधिक रुपये कमावतात.

अहमदनगरमध्येही वडापाव केव्हाच येऊन पोहचला आहे आणि प्रसिद्ध झाला आहे. माणिकचौकातील सोपानराव वडेवाले, चितळे रोडचा बेक्कार वडा, संगमनेर तालुक्यातील समनापूरच्या अन्सार चाचांचा वडापावची राज्यभर ओळख आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News