Maharashtra politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाची आम्हाला आमचे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी होती. मात्र तसे झाले नाही. त्यांच्या वतीने महेश जेठमलानी यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता. तर शिंदे यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली होती.

याशिवाय शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणाला मोठं वळण देणारा निर्णय आता जाहिर झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.
एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता.