Shivsena Symbol : काल राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव मिळाले आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे यांना यामुळे नाव आणि चिन्ह देखील गमवावे लागले आहे. असे असताना आता शिवसेना भवन देखील जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना भवनावर दावा सांगायला मोगलाई लागली का? तसेच शिवसैनिकानो खचून जाऊ नका असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, धनुष्यबाण काढून घेतला. उद्या मशाल देखील काढून घेतील. मात्र शिवसैनिकांनी खचू नका. आपण पुन्हा लढू. अंधेरी पूर्व निवडणुकीत आपण दाखवून दिलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जाहीर करून टाकावं की ७५ वर्षातं स्वातंत्र्य संपल, आता बेबंदशाहीला आम्ही सुरुवात करतो.
आम्ही लाखांमध्ये सदस्यांचे अर्ज दिले. मागितलेली सर्व कागदपत्रे त्यांच्या सूचनेनुसार जमा केली. आजचा निकाल देऊन त्यांना करायचे होतं तेच केलं. मग कशाला आम्हाला एवढा मोठा खटाटोप करायला सांगितला? असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
दरम्यान, ठाकरे गटाची आम्हाला आमचे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी होती. मात्र तसे झाले नाही. त्यांच्या वतीने महेश जेठमलानी यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता. तर शिंदे यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली होती.
उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणाला मोठं वळण देणारा निर्णय आता जाहिर झाला आहे.