Ahmednagar News : अर्धा पावसाळा सरला तरी पुरेशा पावसाअभावी शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग अजूनही कोरडाठाक पाहायला मिळत आहे. जूनच्या अखेरीस अत्यल्प पावसाच्या जोरावर लागवड केलेली खरिपाची पिके त्यानंतर झालेल्या रिमझिम पावसामुळे कशीबशी तग धरून आहेत.
सध्या पावसाने ओढ दिल्याने उत्पन्नाची शाश्वती नाही. तरी शेतकऱ्यांचा पिकांवर मशागतीपासून खुरपणी, खतपाणी, फवारणीचा खर्च सुरूच आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढतच असल्याचे पाहायला मिळते.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव कृषी मंडळात १७ हजार ७३० हेक्टर व चापडगाव कृषी मंडळात ११ हजार ११२ हेक्टर क्षेत्रावर यंदा कपाशी लागवडीसह ९५ टक्के खरिपाचा पेरा पूर्ण झालेला आहे.
तालुक्याचा पूर्व भाग हा दुष्काळी पट्ट्यात येत असून येथील बहुतांश क्षेत्र हे कोरडवाहू आहे. या भागातील संपूर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी मात्र ऑगस्ट महिना उजाडला तरी या भागात अद्याप एकही मुसळधार पाऊस नाही.
त्यामुळे परिसरातील नदीनाले ओढे, तलाव व बंधारे अजूनही कोरडेठाक असल्याचे दिसते. खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून-जुलै महिन्यात झालेल्या तुरळक पावसावर खरिपाची पिके उगवून आली. परंतु, मोठ्या पावसाअभावी पिकांसाठी आवश्यक असणारी ओल जमिनीत नाही.
त्यामुळे काही ठिकाणची कपाशी, सोयाबीन, उडीद, तूर आदी खरिपाची पिके सुकू लागली आहेत. पाणीपातळी खालावल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे ऊस व फळबागाही धोक्यात आहेत.
अशा परिस्थितीतही पाऊस आज न उद्या पडेलच या आशेवर शेतकरी खिशाकडे न बघता काळजावर दगड ठेवून शेतात राबत आहेत. तर हिरवे शेतशिवार फुलण्यासाठी सध्या मोठ्या पावसाची नितांत आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगतात.













