Ahmednagar News : पावसाळा निम्मा संपला, मात्र अजूनही पाऊस झाला नाही. सुरुवातीच्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली; मात्र ही ही पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची उलघाल होत आहे.
यंदाचा खरीप हंगाम हातचा जातो की काय ? अशी भीती शेतकऱ्यांना सतवू लागली आहे. तरी शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
राहुरी तालुक्यात अद्याप कुठेही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या केलेल्या सोयाबीन, बाजरी, कपाशी आदी पिकांची पाण्यामुळे होरपळ होऊ लागली आहे. बहुतेक ठिकाणचे सोयाबीन करपू लागले असून या पिकाने माना टाकल्या आहेत. कपाशी, बाजरी, मका, घास, ऊस, चारा पिके या सर्वांना आता पाण्याची नितांत गरज आहे.’
ज्या शेतकऱ्याकडे विहिरीला पाणी आहे, ते कसेबसे थोडेफार का होईना पाणी देत आहेत; परंतु ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही, त्या शेतकऱ्यांपुढे मोठ्या संकट उभे राहिले आहे.
भूजलपातळीही कमालीची घटली आहे. अनेक बंधारेही कोरडे पडू लागले असून मुळा नदीलाही पाणी वाहिले नाही. अनेक शेतकऱ्यांना तर पाणी असूनही विजेच्या खेळखंडोबामुळे मोठी कसरत करत पाणी द्यावे लागत आहे.
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, कर्जवसुली थांबवून सोयी सवलती जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
पाऊस होणे सध्या अत्यंत गरजेचे आहे. वळण परिसरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन लागवड करण्यात आली होती. उतरण चांगली झाली. त्यानंतर ठिबक, तुषारद्वारे पाणी दिले; परंतु आता या सर्व पिकाला पावसाची पाण्याची नेत्यांत गरज आहे.
शेतकऱ्यांना सातत्याने संकटाला सामोरे जावे लागते. पेरणी केल्यापासून ते मालाला मार्केटमध्ये नेईपर्यंतच्या प्रवासात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची खात्री नसते. शेतकऱ्याच्या हिताच्या केवळ घोषणा होतात, खात्रीशीर व हमखास जेव्हा पदरात पडेल तेव्हाच खरे.