Ahmednagar News : पावसाने दडी मारल्याने आसमानी संकट आल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीकडून पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, तर दुसरीकडे पाटबंधारे विभाग चाऱ्या सोडत नाही. त्यामुळे या सुलतानी संकटाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून लोकप्रतिनिधी काय करतात. याकडे आता त्यांचे लक्ष लागले आहे.
कोपरगाव तालुक्यातील सर्वच भागात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यास भरीसभर म्हणून वीज वितरण कंपनी पूर्ण दाबाने वेळ देत नाही, तर दुसरीकडे व पाटबंधारे विभागाकडून चाऱ्या सोडल्या जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये या दोन्ही विभागावर असंतोष निर्माण झाला.
तालुक्यातील पोहेगाव, सोनेवाडी, चांदेकसारे, देर्डे कोऱ्हाळे, देर्डे चांदवड परिसरात शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन मका, कपाशी, भाजीपाला, टोमॅटो आदी पिके घेतली होती.
गतवर्षामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींना बऱ्यापैकी पाणी होते. तर गोदावरी पाटबंधारे विभागाच्या भरोशावर देखील अनेकांनी आपल्या शेतामध्ये पेरणी केली होती. महिन्यापूर्वी पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके करपली गेली.
विहिरीला पाणी असताना देखील महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा मिळाला नाही. आता पावसाने पाठ फिरवल्यामुळे विहिरीचे पाणीही आटले आहे. तर धरण पाणलोट क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे गोदावरी उजव्या कालव्यातून तातडीने खरिपाला आवर्तन मिळेल,
अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र पाणी अर्ज मागणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यावर दबाव निर्माण करण्यात आला. सात नंबर फार्म भरल्यानंतरच शेतीला पाणी देण्याची भूमिका पाटबंधारे विभागांना घेतल्यामुळे शेतकऱ्यांची या परिसरातील पिके जळून खाक झाली.
या परिसरातील 9 चारी, 27 चारी व हरिसन बँच चारी शेतकऱ्यांना सात नंबर भरण्याच्या आत सोडली गेली असती, तर शेतकऱ्यांच्या हातात आज सोयाबीन, मका, कपाशी लागवड झाली असती. मुळात सात नंबर फार्म भरण्याची प्रक्रियाच शेतीला आवर्तनातून पाणी सुटल्यानंतर व्हायला हवी होती.
मात्र तसाच दबाव स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाटबंधारे विभागावर पडला नाही. तर याच परिसरात काही भागात विहिरीला पाणी असताना देखील वीज वितरण कंपनीने पूर्ण दाबाने वीज दिली नाही. त्याचा सर्व फटका शेती पिकांना बसला आहे.
आता शेतकऱ्यांची पिके पूर्ण वाळून गेली असून आता पाटबंधारे विभाग या चाय सोडण्याचे नियोजन करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. जनावरांचा चारा व अन्नधान्याचा प्रश्न या परिसरात निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
त्यामुळे प्रशासनाने तातडीने या परिसरातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सध्या होत आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.