Ahmednagar News : साडेतीन एकर ऊस जळून खाक ! १०० एकर ऊस वाचवण्यात तरुणांना यश

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील साडेतीन एकर ऊस गुरुवारी (दि.५) दुपारी २ च्या सुमारास विद्युत तारांमधून शॉर्टसर्किट होऊन आग लागून जळून खाक झाला आहे. महावितरण विभागाच्या विद्युत तारांमधून ठिणग्या पडून शॉर्टसर्किट होऊन ऊसाला आग लागली असून सुमारे ५ ते ६ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

ऊसाला आग लागल्याची माहिती गावामध्ये वाऱ्यासारखी पसरताच सुमारे शंभर ते दीडशे युवक घटनास्थळी दाखल होऊन उसाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच तरुणांच्या सतर्कतेमुळे आग लागलेल्या ठिकाणचा जवळपास असलेला शंभर ते दीडशे एकर ऊस जळण्याअभावी वाचला असल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिली आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती आहे की, शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सर्वसामान्य कुटुंबातील अल्पभूधारक शेतकरी आबासाहेब शिंदे व अशोक शिंदे या दोन शेतकऱ्यांचा साडेतीन एकर ऊस हा महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे देखभाल दुरुस्तीचे काम वेळेवर न झाल्याने विद्युत तारेचे एकमेकांना घर्षण होऊन त्यातून ठिणग्या पडून जळाला आहे.

दोन शेतकऱ्यांचे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान या घटनेत झाले असून महावितरण विभागाने या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी. अन्यथा लवकरच महावितरण विभागाच्या गलथान कारभाराविरोधात कोर्टामध्ये कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले उचलली जातील. तसेच रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. – रामनाथ राजपुरे, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेवगाव.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe