Ahmednagar News : राहुरी तालूक्यातील उंबरे येथे काल सोमवारी पहाटे सलग तीन ठिकाणी धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. यात चोरट्यांनी तीन घरांत चोरी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथील जगन्नाथ ढोकणे यांच्या वस्तीवर दोन दिवसांपूर्वी दिवसा ढवळया चोरी झाली होती. ही घटना ताजी असतानाच काल दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास उंबरे गावात वांबोरी रोडलगत असलेले गणेश दुशिंग यांच्या वस्तीवर पहिली चोरी झाली.
येथे चोरट्यांनी घरामधील सामानाची उचकापाचक करून काही घरगुती सामान नेले. तेथून काही अंतरावर असलेल्या बाबुराव पटारे यांच्या वस्तीवर चोरट्यांनी मोर्चा वळवला. तेथे त्यांनी बाबूराव पटारे यांच्या घरातील सामानाची पेटी बाहेर नेऊन उचाक पाचक केली.
मात्र त्या ठिकाणी त्यांना काही सापडले नाही. त्यानंतर चोरट्यांनी पुढे जाऊन बाबासाहेब ढोकणे यांच्या वस्तीवर डल्ला मारला. यावेळी चोरट्यांनी बाबासाहेब ढोकणे यांच्या घरात ठेवलेले महिलांच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र व इतर दागिने
तसेच चार मोबाईल व रोख रक्कम असा एकूण सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल चोरला. त्यावेळी ज्ञानदेव ढोकणे यांना जाग आली असता त्यांनी चोरट्यांना पाहून आरडाओरडा केला; मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच अहमदनगर येथील श्वान पथक, ठसे तज्ञ तसेच राहुरी पोलिस पथकाने घटनास्थळी हजर राहुन पाहणी केली; मात्र चोरट्यांचा कोणताही सुगावा लागला नाही.
एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाल्याने उंबरे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. उंबरे परिसरात वारंवार होणाऱ्या या चोरीच्या घटनांवर पोलिस प्रशासनाने आळा घालून चोरांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी उंबरे परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.