सरकारने आता शाळाही विकायला काढल्या ! सरकारला या तरुणाची स्वप्ने जाळून टाकायची आहेत…

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : केंद्र सरकारकडून विमानतळ, बंदरे, रेल्वे धनदांडग्यांना विकली जात आहेत. आता शाळाही विकायला काढल्या आहेत. तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलिस, शिक्षकांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जात आहे. एकीकडे सुशिक्षित तरुण वर्ग स्पर्धापरीक्षांच्या तयारीसाठी खपत आहे.

मैलो मैल दौड करीत आहे. कंत्राटी पद्धतीने पदे भरून सरकारला या तरुणाची स्वप्ने जाळून टाकायची आहेत. यामुळे राज्य घटनेने दिलेला प्रशासकीय ढाचा पडतो की काय, अशी शंका येत असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले आहे.

पढेगाव येथे आयोजित बैठकीत जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण पाटील नाईक, सरपंच किशोर बनकर,अण्णासाहेब बनकर, रमेश आढाव, अकबर शेख,एकनाथ बनकर, बबनराव बनकर, शशिकांत राजवाळ, सुभाष बनकर, शिवाजी लबडे, विकास बंगाळ आदींसह पढेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

कानडे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार बदलल्यानंतर दीड वर्षापूर्वी मंजूर झालेल्या रस्त्यांना भाजपा सरकारने स्थगिती दिली. याबाबत दोन अधिवेशनांमध्ये आवाज उठविला, तरीही सरकारने दखल न घेतल्याने आपण न्यायालयात गेलो. इतर आमदारांनीही न्यायालयात याचिका दाखल केली.

न्यायालयाने सरकारला म्हणणे मांडण्यास सांगितल्यानंतर शासनाने स्थगिती उठविली. ही कामे आता होत आहेत. विधानमंडळात ही कामे मंजूर करून त्याची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली. मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देता येत नाही.

नकारात्मक मानसिकता असलेल्या सरकारच्या हा निर्णय अंगलट आला. ज्यांनी ज्यांनी राजकीय पक्ष स्थापन केले, ते त्यावेळी विकासाचे गाणे गात होते, मात्र आता या पक्षाच्या नेत्यांना पक्षफूटीने ग्रासले असल्याचे आमदार कानडे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe