Ahmednagar News : नगर अर्बन बॅंकेचा नुकताच बॅंकींग परवाना रद्द झाला. त्यामुळे ठेवीदारांवर मोठे संकट उभे राहिले आहे. परंतु आता हा प्रश्न निकाली काढण्यासाठी ठेवीदार थेट मोदी यांनाच भिडणार आहेत.
त्यामुळे हे प्रकरण मोदींचीही डोकेदुखी ठरणार असं दिसतंय. परंतु मोदींनी लक्ष दिल्यास हे प्रकरण लवकर मार्गी लागून न्याय मिळेल अशी आशा नागरिकांना आहे.
* ठेवीदार साधणार २६ ऑक्टोबरची संधी
26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी शिर्डीला येणार आहेत. शिर्डी साई संस्थानच्या नव्या दर्शन रांगेचे उद्घाटन करणे, निळवंडे धरणातून कालव्यात पाणी सोडण्याचे प्रारंभ करणे आदी कार्यक्रम त्यादिवशी होणार आहेत. त्यामुळे ही संधी साधत त्यांची भेट ठेवीदार घेणार आहेत.
याबाबत स्वतंत्र बैठक घेतली जाणार असून तसे नियोजन केले जाणार आहेत. नगर अर्बन बॅंकेला मल्टीस्टेटचा परवाना चुकीच्या पद्धतीने दिला गेला, झालेल्या कटकारस्थानाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी आदी मागण्या निवेदनाद्वारे प्रंतप्रधानांना करण्यात येणार असल्याचे समजते.
* किती रक्कम गुंतली ?
या बँकेत 5 लाखाच्या आतील ठेवीदारांचे 42 कोटी रुपये अडकले आहेत. 5 लाखावरील ठेवीदारांचे सुमारे 300 कोटी रुपये आडकल्याची माहिती आहे. सध्या या बॅंकेचा रद्द केलेला परवाना पुन्हा बहाल करावा व त्यासंदर्भातील अपिल दाखल होईपर्यंत बॅंकेवर अवसायक नेमू नये या मागणीसाठी सत्ताधारी केंद्रीय सहकार निबंधकांकडे मागणी करत आहेत. तर दुसरीकडे ठेवीदार त्यांचे पैसे पुन्हा घेण्यासाठी आक्रमक झालेत.
* अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात
ही बँक अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. मागेही या बँकेची चौकशी झाली होती. मध्यंतरी झालेली संचालकाची निवडणूक देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आता तर परवानाच रद्द झाला आहे त्यामुळे मोठा गोंधळ उडालेला आहे.