Maharashtra News : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित सुरत- हैदराबाद ग्रीनफील्ड महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी यात जाणार आहेत.
या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या समवेत केंद्रीय मंत्री रस्ते, वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत दिल्ली येथे सकारात्मक बैठक झाली.
यात प्रामुख्याने शेत जमिनी आणि फळ बागांना मिळणाऱ्या अल्प मोबदल्याबद्दल तसेच इतर काही मुद्द्यांवर चर्चा झाली. माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली नगर व नाशिक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मंत्री गडकरी यांच्या भेटीसाठी दिल्ली येथे गेले होते.
यावेळी महामार्गासाठी संपादित केले जाणारे राहुरी नगरपालिका हद्दीतील क्षेत्र हे ग्रीन झोनमध्ये येते. त्यामुळे या शेतकऱ्यांनादेखील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याइतकाच मोबदला मिळावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मंत्री गडकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या, तसेच याविषयी राज्य सरकारच्या संबंधित खात्याकडे बैठका लावण्याच्यादेखील सूचना केल्या.
राष्ट्रवादीचे नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा, उत्तर महाराष्ट्र विभागीय युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलक व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते.