PM Modi Visit Ahmednagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २६ ऑक्टोबरला मुंबईत येत आहेत. ते याआधी साईसमाधी शताब्दी महोत्सवासाठी शिर्डीत आले होते. साईबाबा दर्शन रांगेचे उदघाटन, निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पणसह अनेक कार्यक्रम यावेळी मोदींच्या हस्ते होणार आहेत.
आता या संधीचा राजकीय फायदा देखील मंत्री राधाकृष्ण विखे यांनी घ्यायचं ठरवलंय. आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत. त्यामुळे मोदी यांच्या दौऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी भाजप नेते आणि मंत्री विखे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे.

एक लाख लोक जमवण्याची तयारी
मोदी यांच्या दौऱ्यावेळी जवळपास १ लाख लोक जमवण्याची तयारी विखे यांनी सुरु केली आहे. त्यानुसार नियोजनासाठी सध्या सरकारी आणि पक्षाच्याही बैठका सुरू असून विविध नियोजन सुरु आहेत.
मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पण, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन, साई संस्थानच्या शाळेचे उद्घाटन, महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन, साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेचे उद्घाटन आदी कार्यक्रम होणार आहेत. यासाठी किमान एक ते दीड लाख लोकांची गर्दी येथे आणण्याचे नियोजन विखे यांचे सुरु आहे.
मोदी दौऱ्यावेळी शाळांना सुटी देण्याची मागणी
लोकांच्या ये-जा करण्यासाठी गावनिहाय वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी एसटी बस घेण्यावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. मात्र, बसेस कमी पडत असून गेल्या वेळी शासनाने शिर्डीत हा कार्यक्रम आयोजित केला होता,
तेव्हा एसटी गाड्यांच्या तुटवड्यामुळे लोकांचे हाल झाले होते. त्यामुळे रविवारऐवजी २६ ऑक्टोबरला शाळा बंद ठेवण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. जेणेकरून शाळेच्या बसेस इकडे वापरता येतील. तसेच शाळेत जाण्यासाठी एसटी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येणार नाहीत.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अखत्यारीतील शाळांना सुट्ट्या द्याव्यात, असा प्रस्ताव पालकमंत्री विखे पाटील यांनी मांडला. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही ही मागणी केली. वाहतुकीची जबाबदारी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त विविध नियोजनासाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेत सविस्तर चर्चा केली. तसेच भाजप, शिंदे गट व अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका घेत वेगवेगळे नियोजन केले.













