PM Modi Ahmadnagar Visit : येत्या २६ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत. येथे विविध कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहेत. त्यामुळे आता त्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी सर्वच भाजपचे नेते मंडळी कामाला लागली आहे. परंतु याचा ताण मात्र कर्मचाऱ्यांवर पडत आहे.
या सभेसाठी किमान १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोक जमवायचे असा चंग जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी बांधला आहे. त्यामुळे आता आरोग्य, कृषी, ग्रामपंचायतीसह अन्य विभागांना ‘टार्गेट’ दिले आहे.
उपस्थित राहू पण लाभ तर द्या !
आम्ही सभेस येऊ पण आधी लाभ तर द्या असे म्हण्याची वेळ ठिबक सिंचन योजनेच्या शेतकऱ्यांवर आली आहे. याचे कारण असे की, त्यांना ठिबक सिंचन योजनेतून लाभ मंजूर झाला असला तरी अद्याप रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर जमा झालेली नाही. असे असले तरी त्यांना सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले जात आहे.
सांगतात एक करतात भलतेच…
यापूर्वीचा एक अनुभव लाभार्थ्यांच्या पाठीशी आहे. तो म्हणजे एका ठिकाणच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे सांगून लाभार्थ्यांना कार्यक्रमास घेऊन गेले होते. परंतु त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते न देता बसमध्येच प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे सांगतात एक करतात भलतेच असे काही लाभार्थी म्हणत आहेत.
कर्मचाऱ्यांवर लाभार्थ्याच्या दारोदारी भटकण्याची वेळ
कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून उपस्थिती वाढविण्यासाठी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आर्जव केले जात आहे. लाभार्थ्याच्या दारोदारी भटकण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.
५०० लाभार्थी घेऊन जाण्याचे टार्गेट
आता उदाहरण पाहायचं झालं तर श्रीगोंदा तालुक्याच पहा. येथील कृषी विभागाकडून ५०० लाभार्थी घेऊन जाण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. ठिबक सिंचन संचासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनुदान दिले जात आहे.
परंतु, सरकारकडून तुम्हाला लाभ दिला आहे तर तुम्ही सभेसाठी आलेच पाहिजे, असा आग्रह कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी धरला असल्याचे समजते. ग्रामपंचायतीकडून घरकुल योजनेचा लाभ अनेक लाभार्थ्यांना मिळाला आहे.
महिलांची उपस्थिती वाढविण्यासाठी ….
त्यामुळे या लाभार्थ्यांना देखील उपस्थित राहण्याचे सांगण्यात येत आहे. यातून जिल्हा बँकेचे कर्मचारीही सुटलेले नाहीत. हे कर्मचारी महिलांची उपस्थिती वाढविण्यासाठी दारोदार फिरत असल्याचे चित्र आहे.
अगदी बचत गटांपर्यंत देखील टार्गेट आहे. बचतगटांमार्फत विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना दिला जातो. बचतगटांनाही महिला उपस्थित ठेवण्याचे आदेश संबंधित विभागाकडून देण्यात आले आहेत.