Soybean Farming : खरीप हंगामात पीकविम्यासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. त्यातील सर्वाधिक अर्ज सोयाबिन उत्पादकांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑगस्ट महिन्यात पावसात खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.
पीकविमा नुकसानीच्या निकषात बसलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचे नियोजन आहे, असे कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक विनय कुमार आवटे यांनी दिली.
राज्यातील खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र सुमारे १५१.३३ लाख हेक्टर आहे. त्यापैकी यंदा १४१. ३१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा पावसाअभावी कडधान्य, अन्नधान्यांच्या पेरणींची वेळ निघून गेल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला प्राधान्य दिले.
यंदा ५५ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. सोयाबीनचे क्षेत्र राज्यात सर्वदूर आहे आणि सर्वत्र उत्पादकतेत मोठी घट झाली आहे. सरासरी एकरी आठ ते अकरा क्विंटल उत्पादन होते. यंदा केवळ चार ते सात क्विंटल उत्पादन होत आहे.
खरीप हंगामात उत्पादीत होणाऱ्या सोयाबीनला केंद्र सरकारने ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला होता. यंदा प्रत्यक्षात सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० रुपये दर मिळत आहे.
मागील वर्षी सोयाबीन सरासरी ५ हजार ५०० रुपयांनी विकले जात होते. हंगामाच्या अखेरीस प्रतिक्विंटल दर सात हजार रुपयांवर गेला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन खर्चात वाढ झालेली असताना दर कमी मिळत आहे.
त्या मुळे उशिराने झालेल्या पेरण्या, ऑगस्टमध्ये पावसाने दिलेली ओढ आणि पावसाअभावी रोगाचा प्रादूर्भाव होत सोयाबीन उत्पादनात पन्नास टक्क्यांहून जास्त घट येत आहे. त्यात भर म्हणून बाजारात हमीभावाइतकाही दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.