राहुरी तालुक्यात दूध भेसळ थांबेना कारवाई होऊनही तपास होत नसल्याचे कारण, दूध दरात मोठी घसरण

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करूनही पोलिसांकडून तपास होत नसल्याने दूध भेसळखोरांचे मनोधैर्य वाढले आहे. त्यामुळे दूध भेसळीचे प्रकार थांबत नसल्याचे दिसत आहे. सहा महिन्यांपूर्वी ३८ रुपये प्रति लिटर असणारा दर आता ३० रुपयांवर आल्याने प्रामाणिक शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीशी सामना करावा लागत आहे.

राहुरी तालुक्यात सणासुदीच्या काळात दूध भेसळीला उधाण येत आहे. सुमारे ६ महिन्यांपूर्वी राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात दूध भेसळ करणाऱ्या दोन शेतकऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कृत्रिम दूध, लिक्विड पॅराफिन सारखे घातक रसायन जप्त केले. राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.

मात्र पोलिसांनी दूध भेसळीचा गंभीर प्रकार असताना आरोपींना अटक करून योग्य तपास करणे आवश्यक असताना भेसळीचे दूध कोठे जात होते? भेसळीचे साहित्य पावडर, लिक्विड पॅराफीन कोठून घेतले होते. या प्रकरणात अजून किती आरोपी आहेत याचा कोणताही उलगडा झाला नाही.

या घटनेनंतर श्रीगोंदा तालुक्यात ही अशा प्रकारे छापा टाकण्यात आला होता. मात्र त्याचा योग्य तपास होऊन त्यातील आरोपी अटक करण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यातील आरोपींचे धागेदोरे राहुरी पर्यंत आले मात्र राहुरीच्या प्रकरणाचा तपास अजूनही झाला नाही. याचे गौडबंगाल काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

दुधाला सध्या ३० ते ३२ रुपये प्रति लिटर इतका भाव मिळत असल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधान व्यक्त करत असले तरी दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात दुग्धजन्य खाद्य पदार्थांची मागणी वाढते. दुसरीकडे याच संधीचे सोने करून दुधात भेसळ करून आपले उखळ पांढरे करण्याचा काही भेसळखोरांनी सपाटा लावला आहे. दुधात भेसळ करण्याचा गोरख धंदा पुन्हा एकदा तेजीत सुरू झाला आहे. या भेसळीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

राहुरी तालुक्यातील राहुरी, राहुरी स्टेशन, तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव, मानोरी, केंदळ बु., केंदळ खुर्द, वळण, उंबरे ही वाळू तस्करी साठी प्रसिद्ध असलेली ठिकाणे आता दूध भेसळीसाठीही कुप्रसिद्ध झाली आहे. नदीकाठचा भाग कायम बागायत म्हणून गणला गेला आहे. यावर्षी पाऊस नसल्याने हातात आलेली पिके अडचणीत आहेत.

त्याचबरोबर जनावरांचा चारा म्हणून ओळखले जाणारे पिके घास, मका, कडवळ, गिन्नी गवत आदी महाग झाले आहे. चाऱ्या अभावी अनेकांनी जनावरे बाजारात विकली असून बोटावर मोजण्याइतकी जनावरे गोठ्यात ठेवली. भरपुर प्रमाणात दुध संकलनासाठी हा भाग ओळखला जात होता.

जनावरांची संख्या घटल्याने दुध संकलनात घट झाली. परंतू दूध संकलनाची घट भरुन काढण्यासाठी दुधात भेसळ करून दुध संकलन वाढविण्याची किमया या भेसळीच्या आगार असलेल्या ठिकाणी केली जात आहे. सर्वाधिक भेसळीचे दुध याच भागातून बनले जात असल्याचे बोलले जात आहे.

दोन वर्षांपूर्वी २५ रुपये प्रति लिटर भाव दुधासाठी मिळत होता परंतु सध्या ३० रुपये पर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग दुग्ध व्यवसायात काही प्रमाणात समाधानी असल्याचे दिसून येते. मात्र दूध उत्पादकांना मका, ऊस, पशुखाद्य, वाळलेला चारा, भुसा,

जनावरांचे औषधे यावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. मुक्त गोठा संकल्पना राबवत अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक काहीच काम नसल्याने या व्यवसायात उतरून कष्टाने चांगली प्रगती करत आहेत. मात्र या व्यवसायात काही भेसळ करणाऱ्या अपप्रवृत्तीनी शिरकाव केल्याने प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे बदनामी होत आहेत.

भेसळीचे दुध आबालवृद्धांसाठी घातक

भेसळीच्या दुधाच्या सर्वात जास्त दुष्परिणाम लहान मुलांवर होत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय सूत्र नेहमी देत आहे. असे असतानाही अन्न औषध प्रशासन कारवाईसाठी पुढाकार घेते मात्र पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने दुध भेसळीला रान मोकळे सापडले आहे.

दुध धंद्यात भेसळ नेमकी कोण करतो याची सर्व माहिती ‘अन्न औषध प्रशासन व पोलिसांना असतानाही दूधभेसळ तपासणारी यंत्रणा झोपेचे सोंग घेत असल्याने भेसळ करणाऱ्यांना रान मोकळे मिळत आहे. मागील कारवाई झालेल्या प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तपास करावा. आताही मोठ्या प्रमाणात दूधभेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व शेतकरी करत आहेत.

राहुरी तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकला. यामध्ये लिक्विड पॅराफीन हे घातक रसायन, व्हे. पावडर कोदून घेतली होती?, संबंधित दूध कोठे जात होते याचा पोलिसांनी योग्य तपास केला नाही. त्यानंतर श्रीगोंदा येथील छाप्यातील आरोपी अटक होऊन त्याचे धागेदोरे राहुरी पर्यंत पोहोचले परंतु स्थानिक प्रकरणाचा तपास झाला नाही याचे गौडबंगाल काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने आता धडक मोहीम हाती घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe