निळवंडेच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही : आ. बाळासाहेब थोरात

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील देवकौठे ग्रामस्थांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व निळवंडे धरणाचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांचे जेसीबीतून फुलांची उधळण करत स्वागत केले.

निमित्त होते, नवरात्र उत्सव, सोसायटीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांच्या शुभारंभाचे. निळवंडे धरणाच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे आश्वासन आमदार थोरात यांनी जनतेला यावेळी दिले.

देवकौठे सोसायटी इमारतीचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांचा शुभारंभ रविवारी आमदार थोरात यांच्या हस्ते झाला. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, महेंद्र गोडगे, सुधाकर जोशी, सचिन दिघे, अनिल कांदळकर, भारत मुंगसे, भागवत आरोटे, हौशीराम सोनवणे, नवनाथ अरगडे, अविनाश सोनवणे, ज्योती मोकळ, जिजाबाई मुंगसे व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, अडचणींवर मात करून दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण पूर्ण केले. आपल्या काळातच कालव्यांची कामे पूर्ण झाली. परंतु, श्रेयासाठी पाणी उशिरा सोडले गेले.

सध्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून हा जीवनातील आनंदाचा क्षण आहे. या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, हा सातत्याने प्रयत्न राहणार आहे.

तालुक्यात वाडी-वस्तीवर विकास योजना राबवल्या. रस्त्यांच्या कामासाठी ७७ कोटींचा निधी मिळवला. त्याला स्थगिती देण्यात आल्याने सुप्रीम कोर्टात जाऊन उठवली. आता रस्त्यांची कामे पूर्ण होतील.

कुणाचे वाईट केले नाही, चांगले काम करणे आपली परंपरा आहे. येणारे सरकार महाविकास आघाडीचे असेल. डॉ. तांबे म्हणाले, तालुक्यात आमदार थोरात यांनी अनेक विकास योजना राबवल्या. निळवंडे धरणव कालव्यांची कामे त्यांनीच केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe