बीड जिल्ह्यात झालेल्या दोन भीषण अपघातांत ९ ठार ; २३ गंभीर जखमी !

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : बीड जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळया भीषण अपघातांत ९ जण ठार तर तेवीस गंभीर जखमी झाले आहेत.पहिल्या अपघातात खासगी बस पलटी झाल्याने ५ जणांचा मृत्यू झाला तर तेवीस जण जखमी झाले आहेत.

हा अपघात गुरुवारी (दि. २६) पहाटे जामखेडपासून पाच ते सहा किमी. अंतरावर आष्टी तालुक्यातील चिंचपूरजवळ घडला. जखमींना तातडीने जामखेड, नगर व आष्टी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुसऱ्या अपघातात मालवाहतूक ट्रकला रुग्णवाहिकेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.२५) रात्री १० वाजण्याच्या सुमारास आष्टीजवळ घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री (एन. एल. ०१ बी. २४९९) ही खासगी बस मंबईहून बीडकडे यस प्रवासी घेऊन निघाली होती. ही बस गुरुवारी (दि. २६) सकाळी सहाच्या सुमारास आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा फाटा, या ठिकाणी आली असता, अचानक बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस एका पुलाला धडकून रस्त्यावरच पलटी होऊन दोनशे फूट पुढे घसरत गेली.

या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तेवीस जण जखमी असून, पंचवीस ते तीस जण किरकोळ जखमी झाले आहेत. धोंडीबा यशवंत शिंदे (वय ३६) रा. भिल्लारवाडी पो. जाटनांदूर ता. शिरूर जि. बीड, देविदास दत्तू पेचे रा. सौताडा ता. पाटोदा जि.बीड,

अशोक महादेव भोंडवे पिट्टी नायगाव ता. पाटोदा जि. बीड, महमद आसिफ दोस्त महमद खान रा. कुर्ला मुंबई पश्चिम, रवी यादव गोंडवे (वय २८) मोतीनगर डीग्रस ता. पुसद जि. यवतमाळ या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला

तर २३ जण जखमी झाले असून जामखेड येथे खाजगी दवाखान्यात करण जगदिश सावरिया (वय ४ महिने) डिग्रस पुसद, शाम वानखेडे (वय १९), रज्जाक पठाण (३७) जामखेड, परसराम रणसिंग (४५), लक्ष्मी परसराम रणसिंग (४०), आपटी ता जामखेड,

आशिष मोहिते (३५), शितल मोहिते (३०), वीर आशिष मोहिते (वय ३ वर्षे), जवळा ता जामखेड, मच्छिद्र जायभाय (३३), तांदूळवाडी वीड, जैनव मुस्तकीम शेख (४४), प्रतिक्षा चव्हाण बीड असे अकरा जण उपचार घेत आहेत. उर्वरित जखमी अहमदनगर आष्टी याठिकाणी उपचारासाठी पाठविले आहेत.

घटनेची माहिती मिळताच आ. सुरेश (आण्णा) धस यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीची पाहणी करत मदत केली. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, रमेश (दादा) आजबे, माजी सरपंच सुनील कोठारी, संदेश कोठारी, अमोल गिरमे, गणेश डोंगरे,

चिचपूरचे सरपंच ढवळे मेजर, हरिनारायण आष्टा येथील सरपंच पठाडे, जामखेडचे वसीम सय्यद, गणेश बांदल, प्रविण उगले, आ. रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक विनय डुकरे, यांनीदेखील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.

घटनास्थळी तातडीने पंधरा रुग्णवाहिका व दोन जेसीबींना पाचारण करण्यात आले होते. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर आडवी पडलेली खासगी बस बाजूला घेण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दुसऱ्या अपघातात दौलवडगाव येथे रुग्णवाहिकेने मालवाहतूक ट्रकला धडक दिल्याने ४ जणांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. धामणगाव येथून अहमदनगर येथे पेशंटला घेऊन जात असताना दौलावडगाव येथे रुग्णवाहिका व ट्रक यांचा रात्री १० वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला.

यामध्ये सांगवी पाटण येथील डॉ. राजेश झिंजुर्के (वय ३८) आणि रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडे, (रा. धामणगाव) व अन्य २ जण, अशा एकूण ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका जखमीवर दवाखान्यात उपचार चालू आहेत. रुग्णवाहिकेमध्ये एकूण पाच जण होते. दोन्ही अपघातांत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe