Ahmednagar News : राहुरी – सोनई रस्त्यावरील हॉटेल साईराम उडपी हॉटेलसमोर सोमवारी सायंकाळी हॉटेल मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा जणांवर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लहू रामनाथ धनवटे (वय २७, रा. बालाजी नगर, सोनई) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की सोमवारी (दि. ३०) ऑक्टोबर रोजी हॉटेल साईरामसमोर आरोपींनी तुझ्या आईने आमच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद का दिली,

असे म्हणून आरोपींच्या हातातील कोयता, तलवार, चॉपर, लाकडी दांड्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने हातावर पायावर व डोक्यावर मारहाण करून जबर दुखापत केली. हातातील कट्ट्याने गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या फिर्यादीवरून बुट्टया भांडलकर, आदी वैरागर, विशाल उर्फ पिल्या वैरागर, हरी विलास साळुंखे, मंगेश विलास साळुंखे (सर्व रा. घोडेगाव, ता. नेवासा), ठकन आल्हाट, सागर ईलग, आकाश सुभाष बर्डे उर्फ भावड्या, अविनाश आल्हाट (सर्व रा. मोरे चिंचोरे),
अजय राजेंद्र शिंदे (रा. सोनई) यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात पुढील तपास करीत आहे.
मारहाणीत जखमी झालेले हॉटेल मालक धनवटे हे अहमदनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. दरम्यान, शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक तपासाबाबत सोनई पोलीसांना सुचना केल्या आहेत.